परभणी : जिल्ह्यातून एक जानेवारीपासून विविध ठिकाणाहून गहाळ झालेले सर्वसामान्य नागरिकांचे मोबाइल शोधण्यास जिल्हा पोलिस दलाने एक ते १४ डिसेंबरदरम्यान विशेष मोहीम राबविली. यात एकूण ३८ लाखांचे १८७ मोबाइल शोधण्यात पोलिसांना यश आले. सदरील सर्व मोबाइल संबंधित तक्रारदार यांना पोलिस मुख्यालयात शुक्रवारी पोलिस अधीक्षक रागसुधा. आर. यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
शहरासह जिल्ह्यातून विविध ठिकाणी गहाळ झालेले मोबाइल शोधण्यासाठी पोलिस अधीक्षक रागसुधा. आर. यांच्यासह अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांनी स्थानिक गुन्हा शाखा आणि सायबर पोलिस, जिल्ह्यातील १९ पोलिस ठाण्यांचे अंमलदार यांचे विशेष पथक तयार केले. कार्यक्रमास शहराचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डांबळे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण, पोलिस निरीक्षक सुभाष अनमूलवार, चितांबर कामठेवाड, शरद जऱ्हाड, सहायक पोलिस निरीक्षक वामन बेले यांच्यासह पोलिस कर्मचारी गणेश कौटकर, बालाजी रेड्डी आणि विविध ठिकाणचे पोलिस कर्मचारी उपस्थित होते. यापूर्वी जुलै आणि सप्टेंबर महिन्यात दोन वेळेला अशाच प्रकारे हस्तगत केलेले मोबाइल संबंधितांना पोलिस ठाणे स्तरावर वितरित केले होते.
या मोहिमेत एक ते १४ डिसेंबरदरम्यान गहाळ झालेले मोबाइल शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. ३८ लाखांचे १८७ मोबाइल पोलिसांना सापडले. ही मोहीम परभणी, नांदेड, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, सातारा, बीड, हिंगोली, नाशिक, पुणे, अकोला, वाशिम, नगर, बुलढाणा, धाराशिव व तेलंगणा राज्यातील निजामाबाद या भागात राबविण्यात आली. हस्तगत केलेले मोबाइल संबंधित तक्रारदार यांना पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने पोलिस मुख्यालयाच्या कार्यक्रमात अधिकाऱ्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
१४ पथकात २९ अंमलदारपोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेमध्ये एकूण १४ पथके तयार केली. त्यात २९ अंमलदारांची नियुक्ती केली होती. प्रत्येक पोलिस ठाण्यातील दोन अंमलदारांचा यामध्ये सहभाग होता. त्यांनी सदरील ठिकाणी जाऊन हे मोबाइल हस्तगत केले आहेत. पोलिस अधीक्षक रागसुधा. आर. यांनी या मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलिस अंमलदारांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला.
तक्रारदारांमध्ये समाधानविविध ठिकाणी गहाळ झालेले मोबाइल थेट तक्रारदार यांना या मोहिमेमध्ये हस्तगत केल्यानंतर त्यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. यापूर्वी दोन मोहिमांत सुद्धा जवळपास २५० हून अधिक मोबाइल वितरित करण्यात आले आहेत. आता या मोहिमेत १८७ मोबाइल परत देण्यात आले. त्यामुळे नागरिकांकडून या मोहिमेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.