लसीकरणाकडे गर्भवतींची पाठ; जिल्ह्यात होणार स्वतंत्र नोंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:13 AM2021-07-20T04:13:53+5:302021-07-20T04:13:53+5:30
परभणी : गर्भवती महिलांनीही जास्तीतजास्त संख्येने लसीकरण करावे, यासाठी प्रशासनाकडून जनजागृती केली जाणार असून, या महिलांनी केलेल्या लसीकरणाची आता ...
परभणी : गर्भवती महिलांनीही जास्तीतजास्त संख्येने लसीकरण करावे, यासाठी प्रशासनाकडून जनजागृती केली जाणार असून, या महिलांनी केलेल्या लसीकरणाची आता स्वतंत्र नोंद घेतली जाणार आहे.
जिल्ह्यात गर्भवती महिलांनी लसीकरणाकडे पाठ फिरविली आहे. आतापर्यंत झालेल्या लसीकरणामध्ये बोटावर मोजण्याइतक्याच महिलांनी लसीकरण करून घेतले आहे. मात्र, प्रत्यक्षात किती गर्भवती महिलांचे लसीकरण झाले, याची आतापर्यंतची आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र, यापुढे लसीकरणाच्या पोर्टलवर स्वतंत्ररीत्या गर्भवती महिलांनी केलेल्या लसीकरणाची नोंद घेतली जाणार आहे, तसेच या महिलांचे लसीकरण वाढावे, यासाठी पाठपुरावाही केला जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग आता कमी झाला आहे, परंतु तो पूर्णपणे थांबलेला नाही. भविष्यात कोरोनापासून स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी प्रत्येकाने लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे असल्याने लसीकरणाचा वेग वाढविला जाणार आहे.
प्रसूतीच्या काळात कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी की नाही, याबद्दल संभ्रम होता, परंतु आता गर्भवती महिलांनीही लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले जात आहे. तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्याने लवकरच लस घेणार आहे.
- महामुनी,
प्रसूतीच्या काळामध्ये आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. त्यामुळे लसीकरण अथवा इतर वैद्यकीय उपचारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच लसीकरण करणार आहे. आतापर्यंत लस घेतलेली नाही.
- गर्भवती स्त्री
गर्भवती महिलांनीही लसीकरण करणे आवश्यक आहे. या महिलांच्या लसीकरणापूर्वी त्यांना लसीकरण का करावे, यामुळे आरोग्याला कोणताही धोका होणार नाही, याची माहिती दिली जाणार आहे.
- डॉ.रावजी सोनवणे, लसीकरण प्रमुख
पोर्टलवर घेतली जाणार स्वतंत्र नोंद
लसीकरणासाठी शासनाने स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलवर आतापर्यंत फ्रंटलाइन वर्कर्स, हेल्थ वर्कर्स, १८ ते ६० वर्षांपर्यंतचे नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या लसीकरणाची स्वतंत्र नोंद घेतली जात आहे. आता येथून पुढे गर्भवती महिलांनी लसीकरण केल्यानंतर, त्यांचीही स्वतंत्र नोंद घेण्याची व्यवस्था या पोर्टलवर करण्यात आली आहे. त्यामुळे येथून पुढे किती गर्भवती महिलांनी लसीकरण करून घेतले, याची माहिती उपलब्ध होणार आहे. सध्या तरी ही माहिती उपलब्ध नाही.