लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : भारतीय कपास निगम (सीसीआय) आणि महाराष्ट्र कापूस फेडरेनशनने जिल्ह्यात १२ ठिकाणी हमीभाव कापूस खरेदी केंद्र सुरू केली असून, या दोन्ही संस्थांनी आतापर्यंत ५१ हजार ७४ शेतकऱ्यांकडील १३ लाख ७३ हजार ६२ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे.
यावर्षी अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. या संकटातून वाचलेल्या कापसाची विक्री करण्यासाठी खुल्या बाजारपेठेत कापसाची आवक करण्यात आली. मात्र, योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. डिसेंबर महिन्यात जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी कापूस खरेदीला प्रारंभ झाला. भारतीय कपास निगमसह, कापूस फेडरेशनेही तालुक्याच्या ठिकाणी केंद्र सुरू करुन खरेदीला प्रारंभ केला. मानवत, सेलू, जिंतूर, ताडकळस, पूर्णा, सोनपेठ आणि बोरी येथील बाजार समितीत सीसीआयमार्फत कापूस खरेदी केली जात आहे. त्याचप्रमाणे पाथरी, परभणी, गंगाखेड, पालम, आणि सोनपेठ याठिकाणी फेडरेशनने कापूस खरेदी सुरू केली.
शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करण्यासाठी फेडरेशनने ऑनलाईन नोंदणी करुन घेतली. त्यानुसार ५४ हजार ५७३ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. या दोन्ही संस्थांनी १३ लाख ७३ हजार ६२ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. मध्यम लांबीच्या कापसाला ५ हजार ५१५ रुपये तर लांब रेशम कापसाला ५ हजार ८२५ रुपये प्रतिक्विंटल असा भाव दिला जात आहे.
सीसीआयने खरेदी केला ४० हजार शेतकऱ्यांचा कापूस
सीसीआयने जिल्ह्यात सर्वाधिक कापूस खरेदी केला आहे. नोव्हेंबर महिन्यातच सीसीआयने जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र सुरू केले होते. आजपर्यंत सीसीआयने ४० हजार १६२ शेतकऱ्यांचा १० लाख ३१ हजार ५९ क्विंटल कापूस खरेदी केला आहे. महाराष्ट्र कापूस फेडरेशनने मात्र उशिराने कापूस खरेदीला प्रारंभ केला. फेडरेशनच्या केंद्रावर आतापर्यंत १० हजार ९१२ शेतकऱ्यांचा ३ लाख ४२ हजार ३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.
आणखी पंधरा दिवस चालेल खरेदी
जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे अजूनही मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी ३ हजार शेतकऱ्यांकडील कापसाची खरेदी होणे बाकी आहे. त्यामुळे हा कापूस खरेदी करणे तसेच ऐनवेळी येणाऱ्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी आणखी किमान पंधरा दिवस कापूस खरेदी केंद्र सुरू राहतील, अशी अपेक्षा आहे.