परभणी- जिल्ह्यात मान्सून दाखल झाला नसला तरी मान्सूनपूर्व पाऊस जोरदार बरसत असल्याने शेतकरी सुखावला आहे. मंगळवारी जिल्हाभरात ११.७७ मि.मी. पाऊस झाला.
यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेत होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यापूर्वीच पाऊस सुरु झाला आहे. रविवारी मध्यरात्री व त्यानंतर मंगळवारी पहाटे जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. परभणी शहरात दोन तास हा पाऊस बसरला. त्यामुळे शहरात सखल भागात पाणी साचले होते.
जिल्हाभरात सर्वदूर पाऊस झाला असून परभणी तालुक्यात सरासरी १९.५० मि.मी. पाऊस झाला आहे. परभणी शहरामध्ये २७ मि.मी. पाऊस झाला आहे. तर ग्रामीण भागात २४ मि.मी.पाऊस झाला. पालम तालुक्यात २१ मि.मी., पूर्णा ८.६०, गंगाखेड ६,५०, सोनपेठ २३, सेलू १४, पाथरी ५, जिंतूर १७.६७ आणि मानवत तालुक्यामध्ये ४.६७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सोनपेठ मंडळात सर्वाधिक ३६ मि.मी. पाऊस झाला असून त्या खालोखाल पूर्णा तालुक्यातील चुडावा मंडळात ३४ मि.मी.पाऊस झाला आहे.