परभणी : जिल्ह्यातील पिक कर्ज वाटपाची गती वाढविण्यात यावी तसेच पीक कर्ज वाटपात जाचक अटी नियम व कागदपत्रांची मागणी बंद करावी यासह अन्य ६ मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २५ जून रोजी सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. काळीकमान येथे झालेल्या अर्धा तासाच्या आंदोलनामुळेपरभणी-नांदेड महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी प्रशासनाला २१ जून रोजी निवेदन सादर केले होते. मात्र, यातील मागण्या पूर्ण न झाल्याने शुक्रवारी सकाळी ११ वाजता वसमत रोडवरील काळी कमान येथे पदाधिकाऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. यामध्ये पिक कर्ज वाटपाची गती वाढविण्यात यावी, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना देण्यात यावा, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम शासनाने द्यावी, जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एफआरपीची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ वितरित करावी, गंगाखेड शुगर लिमिटेड माखणी या कारखान्याने शेतकऱ्यांची ऊस बिलाची रक्कम परत करावी, शासकीय दूध दरवाढ करावी, तसेच झरी फिडरवर झालेला जास्तीचा भार कमी करण्यासाठी बोरी व परिसरातील इतर लाईन दुसऱ्या फिडरला जोडाव्यात, अशी मागणी रास्तारोको दरम्यान स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. आंदोलनात किशोर ढगे, गजानन तुरे, भास्कर खटिंग, केशव अरमळ, राजाभाऊ लोंढे, दिगंबर पवार, शेख जाफर, रामेश्वर आवरगंड, उद्धव जवंजाळ, मधुकर चोपडे, अजय खटिंग, राम दुधाटे, गजानन खटिंग, काशिनाथ शिंदे, माऊली शिंदे, रामप्रसाद गमे यांचा सहभाग होता. प्रशासनाने रास्ता रोको आंदोलनस्थळी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.