कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवांनी लागू नसलेली वेतनश्रेणी घेतली; २१ लाख रुपये भरण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 02:49 PM2021-06-16T14:49:53+5:302021-06-16T14:50:44+5:30
Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth मुंबई येथील नगरविकास विभागातील उपायुक्त रणजीत आण्णासाहेब पाटील यांची २२ ऑक्टोबर २०१८ रोजी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती झाली.
परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कुलसचिव रणजीत अण्णासाहेब पाटील यांनी त्यांना लागू नसलेली वरिष्ठ वेतनश्रेणी घेऊन २१ लाख ४ हजार २९५ रुपये जास्तीची शासनाकडून रक्कम घेतली आहे. ही रक्कम तातडीने शासन खाती चलनाद्वारे एक रकमी भरावी, असे आदेश विद्यापीठाच्या नियंत्रकांनी दिले आहेत.
मुंबई येथील नगरविकास विभागातील उपायुक्त रणजीत आण्णासाहेब पाटील यांची २२ ऑक्टोबर २०१८ रोजी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती झाली. त्या दिवसांपासून त्यांना लागू नसलेली ३७४००-६७०००, ग्रेड वेतन ८७०० ही वेतन श्रेणी घेतली. विशेष म्हणजे २० ऑक्टोबर २०१८ च्या कार्यालयीन आदेशाप्रमाणे मुळ सेवेत लागू असलेले वेतन भत्ते, रजा, प्रवास, वैद्यकीय सवलत, गटविमा योजना याबाबतचे नियम लागू असतील असेही या पत्रात नमूद करण्यात आले होते. तरी देखील त्यांनी पात्र नसताना वरिष्ठ वेतनश्रेणी घेतली. ही बाब वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य लिंबाजीराव भोसले यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी २८ मे रोजी कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांच्याकडे तक्रार केली.
त्या तक्रारीनंतर करण्यात आलेल्या चौकशीत कुलसचिव रणजीत पाटील यांनी लागू नसलेली वरिष्ठ वेतनश्रेणी घेऊन २१ लाख ४० हजार २९५ रुपये अधिकचे उचलल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या अनुषंगाने ११ जून रोजी विद्यापीठाच्या नियंत्रकांनी कुलसचिव पाटील यांना पत्र दिले असून, त्यात आतापर्यंत अतिप्रदान करण्यात आलेली २१ लाख ४ हजार २९५ रुपयांची रक्कम तत्काळ शासन खाती चलनाद्वारे एक रकमी भरणा करून समायोजित करावी व तसे केल्याचे उलट टपाली कार्यालयास अवगत करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कुलसचिव पाटील यांनी स्वत:च्या फायद्यासाठी पात्र नसताना वरिष्ठ वेतनश्रेणी घेवून अधिकची रक्कम उचलण्याची अनियमितता केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी रणजीत पाटील यांच्याकडून सदरील रक्कम वसूल करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे माजी आ.विजय गव्हाणे यांनी केली आहे.