परतीच्या पावसाचा फटका; कापसाच्या वाती अन् सोयाबीनची माती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 07:03 PM2020-10-15T19:03:03+5:302020-10-15T19:04:30+5:30
Return rain hits Parabhani : परतीच्या पावसाने नद्या-नाल्यांना पूर आला होता. यामुळेही जिल्ह्यात पिकांची अतोनात हानी झाली.
परभणी : परतीच्या पावसाने परभणी जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचा कापूस तुटलेला होता. या फुटलेल्या कापसाच्या अक्षरशः वाती झाल्या आहेत. तसेच काढून ठेवलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे.
परतीच्या पावसाने नद्या-नाल्यांना पूर आला होता. यामुळेही जिल्ह्यात पिकांची अतोनात हानी झाली. मागील पंधरा दिवसापूर्वी परभणीसह जिल्ह्यात पाऊस धो-धो बरसला. या पावसामुळे जिल्ह्यातील ४६ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे अद्यापही संपूर्ण पंचनामे झाले नाहीत, तोच आता परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाने कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः उघडीप दिल्यानंतर कापूस मोठ्या प्रमाणात फुटला होता. काही शेतकऱ्यांनी कापसाची वेचणी केली असली तरी बहुतांश शेतकऱ्यांची कापसाची वेचणी राहिली होती. या पावसाने फुटलेल्या कापसाच्या वाती झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. सोयाबीनचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून ठेवले आहे. अनेकांची काढणी सुरू आहे. मात्र परतीच्या पावसाने सोयाबीन पूर्णतः भिजली आहे. पाथरी, सेलू, मानवत, पूर्णा, परभणीसह अन्य तालुक्यातील नदी-नाल्यांना पाणी आले होते. सर्वच ठिकाणच्या नद्या तुडुंब वाहत आहेत. नद्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
पुराचे पाणी शेतात शिरल्याने हानी
नदीकाठच्या शेतशिवारात पुराचे पाणी पिकांमध्ये साचून राहिल्याने पिके पिवळी पडली आहेत. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होणार आहे. तसेच सोयाबीनला डाग पडल्याने भावही अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हैराण आहेत.
रब्बी अडचणीत
खरिपाच्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती काहीच पडले नाही. त्यामुळे रब्बीची पेरणी कशी करावी? हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.