मानवत ( परभणी ) : राष्ट्रीय महामार्ग २२२ वर रुढीपाटीजवळ आज दुपारी 2 वाजेच्या दरम्यान रस्ता कोणता निवडावा या गोंधळात लोडींग रिक्षा पलटून अपघात झाला. यात रिक्षामधील सहा महिला आणि पाच लहान मुली किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
परभणी येथील दर्गारोडवरील मासुम कॉलनीत राहाणारे शेख फहाद शेख करीम हे आपल्या मालकीच्या लोडींग रिक्षामध्ये ( क्रमांक एम एच १४ व्ही २७८) कुटुंबासह पाथरी तालुक्यातील सय्यद मिया पिंपळगाव येथे एका कार्यक्रमासाठी जात होते. रिक्षा राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील रूढी पाटीजवळ नविन परभणी वळण रस्त्यावर आल्यानंतर रस्ता कोणता निवडावा या गोंधळात चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. या घटनेत कुणालाही गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या नसुन सर्वाना प्राथमिक उपचारासाठी मानवत येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी जखमींना कुठलीही गंभीर इजा झाली नसल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ वाघ यांनी दिली.
अपघातात शेख मरियम शेख जुनेद ( वय ३०), शेख आयेशा शेख शकील ( वय ३५ ), शेख रुबिना शेख जुनेद ( वय ३५ ) ,शेख समिना शेख हमीद ( वय ३० ), सोफीया बेगम शेख शरीफ ( वय ३०), शेख सौफीया शेख शरीफ ( वय ६५) या महिला सह शेख मरियम शेख जुनेद ( वय ५ ), शेख मुसाफिरा शेख शकील ( वय १४ वर्ष), शेख तहुरा शेख हमीद ( वय ११), शैख जैनम शेख फहाद ( वय ६, शेख फातेमा शेख शकील ( वय १४ ) हे जखमी झाले आहेत.