पालिकेच्या प्रभाग क्रमांक १ मधील आंबेडकरनगर भागात रस्त्यावर पावसाचे व नालीचे पाणी साठत असल्यामुळे अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या पाण्यात विषारी प्राणी वावरत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तसेच साठलेले पाणी एका जागेवर जमा होत असल्याने परिसरात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे या भागात मुरूम टाकून मजबुतीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. निवेदनावर सय्यद खय्युम, असद खान, नितीन भदर्गे, राहुल कुंभकर्ण, विकास माने, किशन वाघमारे, महादू चव्हाण, शेख खलील, शेख सद्दाम, जानकीराम गवळी, किसन जंगले, हनुमान गायकवाड, शेख इसाक शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत. मागणी पूर्ण न झाल्यास पालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे.
शहरातील बुद्धनगर, आंबेगावनाका, बांगड प्लॉट, आंबेडकरनगर, पेठ मोहल्ला, फुलेनगर, पावरलूम, राज गल्ली, कोक्कर कॉलनी, बारहाते गल्ली या नगरसह शहरातील विविध प्रभागांतील नाल्या कचऱ्याने तुंबल्या आहेत. पाऊस पडल्यास किंवा नळांना पाणी सोडल्यास या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहते, मात्र कचऱ्यामुळे नाल्या तुंबल्यामुळे पाणी पुढे जात नसल्याने हे पाणी रस्त्यावर येत आहे. हे अस्वच्छ पाणी असल्यामुळे नागरिकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तसेच नालीतील पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालिकेने यामध्ये लक्ष घालून स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.