साडेतीन हजार प्रस्ताव रद्द
परभणी : शेतकऱ्यांना शाश्वत वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी तत्कालीन राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना अमलात आणली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात १० हजार २४ शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव दाखल केले. त्यातील महावितरण कंपनीने साडेतीन हजार प्रस्ताव रद्द केले आहेत.
तीन वर्षांपासून सिग्नल व्यवस्था धूळखात
परभणी : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, बसस्थानक परिसर, शिवाजी चौक, जाम नाका व महाराणा प्रताप चौकात लाखो रुपये खर्च करून वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली होती. मात्र, मागील तीन वर्षांपासून ही यंत्रणा धूळखात पडून आहे. या यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी महानगरपालिका व पोलीस प्रशासनाला लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
दिग्रस बंधाऱ्याची दुरवस्था
परभणी : तालुक्यातील दिग्रस येथील दुधना नदी पात्रात लाखो रुपये खर्च करून बंधारा उभारण्यात आला आहे. या बंधार्यातील पाणी अडवून डिग्रस व आर्वी येथील पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, मागील काही दिवसांपासून या बंधाऱ्याची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे या बंधाऱ्यात अडवलेले पाणी झिरपून जात आहे. याकडे जलसंपदा विभागाने लक्ष देऊन या बंधाऱ्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.