परभणी : परभणी येथील रेल्वेस्थानकावर शनिवारी सकाळी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान विकास कांबळे यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाचे प्राण वाचले आहेत. ही घटना आज सकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर सकाळी ६.४५ वाजता घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर धर्माबाद ते मनमाड मराठवाडा एक्सप्रेस ही रेल्वेगाडी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.४५ वाजता रेल्वे स्थानकावर दाखल झाली. ही गाडी निघाल्यानंतर पंकज सैनी हा प्रवासी औरंगाबादला जाण्याकरीता चालत्या गाडीत चढू लागला. त्यावेळी त्या प्रवाशाचा पाय निसटला अन् तो चालत्या गाडीखाली कोसळणार एवढ्यात प्लॅटफॉर्मवर ड्युटीवर असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे जवान विकास कांबळे यांनी मोठ्या चपळतेने झेप घेवून त्या प्रवाशास बाहेर खेचून काढले. त्यामुळे प्रवाशी सैनी हे बालंबाल बचावले.
रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक एस. बी. कांबळे यांच्या सह आरपीएफच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जवान विकास कांबळे यांचा सत्कार केला. दरम्यान, प्रवासी पंकज सैनी हे बँक अधिकारी असून त्यांना औरंगाबाद येथून विमान गाठायचे असल्याने रेल्वे सुटू नये या गडबडीत रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करीत असताना हा प्रकार घडला. सैनी यांना वाचविल्यानंतर पोलीस निरीक्षक एस. बी. कांबळे यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांना कुठेही इजा झाली नसल्याची खात्री केल्यानंतर त्यांना पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.