साई जन्मभूमी वाद पोहोचणार खंडपीठात; पाथरी विश्वस्तांनी घेतला निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 12:59 PM2020-01-23T12:59:23+5:302020-01-23T13:19:17+5:30
मुख्यमंत्री ठाकरे यांनी वादावर पडदा टाकण्याची भूमिका घेतल्या नंतर पाथरीत साई भक्त आक्रमक
- विठ्ठल भिसे
पाथरी : पाथरी येथील साईबाबा जन्मभूमीचा वाद आता अधिकच पेटला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वादावर पडदा टाका अशी भूमिका घेतल्यानंतर पाथरी साई संस्थांच्या विश्वस्तांची गुरुवारी ( दि. २३ ) सकाळी तातडीने बैठक घेण्यात आली. विश्वस्तांनी आता या वादावर तोडगा काढण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी दिली आहे.
संत श्रेष्ठ श्री साईबाबा यांच्या पाथरी येथील जन्मभूमीच्या 100 कोटी रुपये विकास आराखड्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील बैठकीमध्ये मान्यता दिली होती , त्यानंतर शिर्डीवाशिया कडून वाद निर्माण करण्यात आला, तर पाथरी येथील साई संस्थान साई भक्त विश्वस्त आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र येऊन पाथरी हीच साई जम्मभूमी असल्याच्या दाव्यावर ठाम राहिले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटी नंतर शिर्डीकरं समाधानी झाले. दुसरीकडे पाथरी येथे महाआरती आणि सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर २२ जानेवारी रोजी खा संजय जाधव यांनी या बाबत मुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. यावेळी आता या वादावर पडदा टाका अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतली. मात्र यावर पाथरीकरांचे समाधान झाले नसल्याचे चित्र आहे.
खंडपीठाला समिती नेमण्याची करणार विनंती
यानंतर गुरुवारी ( दि. २३ ) सकाळी पाथरी साई संस्थान विश्वस्त आणि कृती समितीची बैठक पार पडली. साई जन्मभूमी पाथरीच असून याचे ठोस पुरावे विश्वस्तांकडे आहेत. आता या वादावर कायमचा तोडगा काढण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात जाण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. खंडपीठाला या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी एक समिती तयार करावी अशी विनंती करणार असल्याची माहिती आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी लोकमतला दिली.