दोन महिन्यात ४० हजार क्विंटल सोयाबीनची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:26 AM2020-12-05T04:26:53+5:302020-12-05T04:26:53+5:30
मानवत : सोयाबीनला हमी दरापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने यंदाच्या हंगामात एकाही शेतकऱ्याने हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री केले ...
मानवत : सोयाबीनला हमी दरापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने यंदाच्या हंगामात एकाही शेतकऱ्याने हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री केले नाही तर दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डातील खासगी व्यापाऱ्यांना ४० हजार क्विंटल सोयाबीन विक्री केल्याची नोंद बाजार समितीकडे आहे.
तालुक्यात ४३ हजार ९७ हेक्टरवर यावर्षीच्या खरीप हंगामात पेरणी झाली. यामध्ये २१ हजार ६३५ हेक्टरवर कापूस तर १५ हजार ७७३ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयाबीनचा पेरा ३ हजार हेक्टरने वाढला होता. दिवाळीच्या आगोदर हमखास पैसे मिळवून देणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. काही शेतकऱ्यांची सोयाबीनची लागण अगोदरच असल्याने बाजारपेठेत विक्रीसाठी तयार झाले हातेे. या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डातील बाजारपेठेत १४ सप्टेंबरपासून नवीन सोयाबीन आणण्यास सुरुवात केली. सुरुवातीला सोयाबीनला २ हजार ८०० ते ३ हजार रुपयांचा भाव मिळाला. शासनाने ३ हजार ८०० रुपये हमीभाव जाहीर केला होता. मात्र हमीभाव केंद्र वेळेत सुरू न झाल्याने आर्थिक चणचण दूर करण्यासाठी सोयाबीन उत्पादक शेतकरी आपले सोयाबीन विक्री करून मोकळे झाले होते. भाव वाढला असल्याने काही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री न करता घरातच राखून ठेवले होते. ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनच्या भावात तेजी येऊन हे भाव ४ हजार ४०० रुपयंपर्यंत गेले. भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन विक्रीला काढले. ऑक्टोबर, नोव्हेंबर या दोन महिन्यात मानवत येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डातील खासगी आडत व्यापाऱ्यांना ४० हजार क्विंटल सोयाबीनची विक्री केल्याची नोंद बाजार समितीकडे आहे. सद्यस्थितीत हे सोयाबीन नेहमीच्या दरापेक्षा जास्त दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल खासगी व्यापाऱ्यांना सोयाबीन विक्री करण्याकडे असल्याचे चित्र आहे. ३ डिसेंबर रोजी झालेल्या लिलावात सोयाबीनला ४ हजार ५०० रुपये दर मिळाला. हा दर हमीभावापेक्षा १०० रुपयांनी जास्त आहे.
शासकीय खरेदी केंद्र सामसूम
मागील दोन महिन्यांपासून खुल्या बाजारात सोयाबीनच्या भावात तेजी असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून येत आहे. त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवून खुल्या बाजारात दोन महिन्यात ४० हजार क्विंटल सोयाबीनची विक्री केली. विशेष म्हणजे तालुक्यात केवळ ४ शेतकऱ्यांनी सोयाबीन ऑनलाईन विक्रीसाठी नोंद केली आहे.