महात्मा फुले यांच्या स्मारकासाठी परभणीत शोलेस्टाईल आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 03:13 PM2018-11-03T15:13:50+5:302018-11-03T15:17:22+5:30
पुणे येथील भिडेवाड्यात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे, या मागणीसाठी परभणीतील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी पहाटे खाजा कॉलनीतील पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन केले.
परभणी : पुणे येथील भिडेवाड्यात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे, या मागणीसाठी परभणीतील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी पहाटे खाजा कॉलनीतील पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन केले. हे आंदोलन दिवसभर शहरात चर्चेचा विषय बनले होते.
पुणे येथे भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. मात्र सध्या या वाड्याची दुरवस्था झाली आहे. मुलींची पहिली शाळा सुरू झालेली ही वास्तू महाराष्ट्र राज्यासाठी सदैव प्रेरणादायी वास्तू आहे. त्यामुळे भिडेवाड्यात महात्मा ज्योतीबा फुले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे, या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. याच मागणीसाठी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी पहाटे खाजा कॉलनी भागातील जलकुंभावर चढून आंदोलन केले. या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी महादेव किरवले आणि तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या. प्रशासनाच्या आश्वासनानंतर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हे आंदोलन मागे घेण्यात आले.