लोकसहभागातून स्वच्छता ही जनचळवळ व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:42 AM2021-01-13T04:42:36+5:302021-01-13T04:42:36+5:30
सेलू : स्वतंत्रता आंदोलनात जसा जनसमुदाय उत्स्फूर्तपणे सहभागी झाला होता, तसेच लोकसहभागातून स्वच्छता ही जनचळवळ व्हावी, असे मत उपविभागीय ...
सेलू : स्वतंत्रता आंदोलनात जसा जनसमुदाय उत्स्फूर्तपणे सहभागी झाला होता, तसेच लोकसहभागातून स्वच्छता ही जनचळवळ व्हावी, असे मत उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी व्यक्त केले. ते नगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध ऑनलाइन पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध ऑनलाइन स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ नगरपालिका सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विनोद बोराडे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर डॉ. विलास मोरे, किशोर कटारे, गंगाधर कान्हेकर हे होते. पारधी म्हणाले की, निरोगी राहण्यासाठी स्वच्छता ही आवश्यक आहे. आपले घर, अंगण, परिसर, शहर स्वच्छ सुंदर राहण्यासाठी सर्वांनी नगरपालिकेला सहकार्य करावे. स्वच्छता ही आपली जबाबदारी, कर्तव्य असल्याचे ते म्हणाले. पारधी यांच्या हस्ते विविध ऑनलाइन स्पर्धांतील सुभाष बिराजदार, गिरीश गोरे, जयंत डिग्रसकर, गिरीश लोडाया, साक्षी काष्टे, राखी कोनार्ड, राधिका ताठे, प्रियंका भाबट, विजय शिंदे, रवी कुलकर्णी, बालाजी शिरसाट, रवींद्र मुळावेकर, सुखदेव घुले, मयुरी बाहेती, सिद्धांत थोरे, शीतल दोडिया, अरविंद वाटुरे, सुरेश शिकारे, साक्षी थोरात, प्राजक्ता खुपसे, अमोघ मुळावेकर, सुरेश हिवाळे, अर्चना कुलकर्णी, शरद ठाकर आदी विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सम्राट अंभोरे यांनी केले. सूत्रसंचालन मोहन बोराडे यांनी केले. आभारप्रदर्शन अशोक कासार यांनी केले.