८४ अग्निरोधक यंत्रावर जिल्हा सामान्य रुग्णालयाची सुरक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:42 AM2021-01-13T04:42:40+5:302021-01-13T04:42:40+5:30
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात आगीमध्ये दहा बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर, येथील आरोग्य विभागाला जाग आली असून, ११ जानेवारी ...
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात आगीमध्ये दहा बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर, येथील आरोग्य विभागाला जाग आली असून, ११ जानेवारी रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलाच्या वतीने रुग्णालय परिसरात प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर, लोकमत प्रतिनिधींनी मंगळवारी आग प्रतिबंधक उपाय करण्याकरिता जिल्हा रुग्णालयातील किचन रूम, बर्न वार्ड, पुरुष विभाग, आयसीयू, ब्लड बँक, अर्थ विभाग, एक्स-रे विभाग, नेत्र रुग्णालय, एसएनसीयू विभाग, औषधी विभाग, अपघात विभाग, लॅब डिपारमेंट यासह २३ विभागांत जाऊन अग्निरोधक यंत्रांची पाहणी केली. जिल्हा रुग्णालयातील एकूण २३ विभागांत ८४ अग्निरोधक यंत्र बसविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या अग्निरोधक यंत्र मुदतीत असले, तरी हे यंत्र कसे हाताळायचे, याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले नाही. विशेष म्हणजे, रुग्णालयातील काही विभागाचे अजूनही फायर ऑडिट करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात आग प्रतिबंधक उपाय करण्याकरिता विविध कक्षात ठेवण्यात आलेले यंत्र हे केवळ शोभेची वस्तू असल्याचे सद्यस्थितीत दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने आग प्रतिबंधक उपाय करण्याकरिता अग्निरोधक यंत्रांची संख्या वाढून कर्मचाऱ्यांना पुरेसे प्रशिक्षण देऊन, हे यंत्र कसे हाताळावे, याबाबत माहिती द्यावी व भविष्यात घडणाऱ्या घटनांवर ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी रुग्णालयासह नातेवाइकांमध्ये होत आहे.
यंत्र पुरेसे जागा अयोग्य
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू, ब्लड बँक, अर्थ विभाग, अपघात विभाग यासह अधिक २३ विभागांत ठेवण्यात आलेली ८४ अग्निरोधक यंत्रे ही रुग्णालयाच्या दृष्टिकोनातून पुरेशी असले, तरी हे यंत्र ठेवण्याच्या जागा मात्र अयोग्य आहेत. भविष्यात एखादी आगीची घटना घडली, तर हे यंत्र सापडण्यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांना मात्र धावपळ करावी लागणार आहे. त्यामुळे यंत्र भरपूर असली, तरी हे यंत्र ठेवण्याची जागा मात्र अयोग्य असल्याचे मंगळवारी केलेल्या पाहणीत दिसून आले.
चार दिवसांपूर्वी भरले ७८ यंत्र
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात १० नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना ९ जानेवारी रोजी घडली. या घटनेच्या दोन दिवसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील ८४ अग्निरोधक यंत्रणांपैकी ७८ अग्निरोधक यंत्रे ही ७ जानेवारी रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने भरून घेतले असल्याचा अहवाल दिला आहे.