लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कोरोनाच्या संसर्गापासून प्रतिबंध करण्यासाठी पैसे देऊन लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचाच पुढाकार असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. खाजगी रुग्णालयात २९२ ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण करुन घेतले आहे. त्या तुलनेत ४५ ते ५९ वयोगटातील केवळ ९५ नागरिकांनीच पैसे मोजून लस घेतली आहे.
कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजाराच्या नागरिकांसाठी लस घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जिल्ह्यात चार खाजगी रुग्णालयात आता लसीकरण केले जात आहे. मागच्या आठवडाभरापासून हे लसीकरण सुरू झाले आहे. खाजगी रुग्णालयात आतापर्यंत २९२ ज्येष्ठ नागरिकांनी पैसे मोजून लस घेतली आहे. तर गंभीर आजार असलेल्या ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील ९५ नागरिकांनी लसीकरण करुन घेतले आहे. त्यामुळे पैसे देऊन लस घेण्यातही ज्येष्ठ नागरिकच पुढे असल्याचे दिसत आहे.
तरूणांपेक्षा ज्येष्ठ एक पाऊल पुढे?
ज्येष्ठ नागरिक आपल्या आरोग्याप्रती जागरुक असतात. स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रसंगी पैसे खर्च करण्यासही ते मागे पुढे पहात नाहीत. जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांची लसीकरणाची आकडेवारी पाहता हेच दिसून येत आहे. त्यामुळे तरुणांच्या तुलनेने ज्येष्ठांनी एक पाऊल पुढे टाकत प्रसंगी पैसे मोजून कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घेतले आहे.
लसीकरणासाठी महिलाही नाहीत मागे
जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार २१८ नागरिकांनी कोरोना लसीकरण करुन घेतले आहे. त्यामध्ये ८ हजार १७० महिलांचा समावेश आहे. ९ हजार ४८ पुरुषांनी लस घेतली आहे. पुरुष आणि महिलांचे लसीकरणाचे प्रमाण पाहता महिलाही लसीकरणासाठी मागे नसल्याचे दिसून येत आहे.
कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित असून, शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध करुन दिल्याने मी लसीकरण करुन घेतले. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षितता वाढण्यास मदत झाली. लस घेतल्याने समाधान वाटते.
प्रकाशराव भरणे, परभणी.