कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. १ मेपासून चार दिवसांसाठी किराणा बाजारपेठ व भाजीपाला दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू होण्याची परवानगी आहे. असे असताना अनेक व्यापाऱ्यांनी सकाळी ११ वाजल्यानंतरही दुकाने सुरू ठेवली तसेच ज्या दुकानांना परवानगी नाही अशी दुकानेही सुरू होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ३ मे रोजी महानगरपालिका आणि नानलपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त मोहीम राबवत कारवाई केली. शहरातील कच्छी बाजार, शिवाजी चौक, गुजरी बाजार, जनता मार्केट या परिसरात विनापरवानगी सुरू असलेल्या १७ दुकानांवर कारवाई करण्यात आली. या व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी ५ हजार याप्रमाणे ८५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच शहरात विनामास्क फिरणाऱ्या २३ नागरिकांकडून ४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई सहाय्यक आयुक्त अल्केश देशमुख व नानलपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, स्वच्छता निरीक्षक विनायक बनसोडे, भीमराव लहाने, प्रकाश काकडे आदींचा पथकात समावेश होता.
परभणी सतरा व्यापाऱ्यांना दुकान सुरू ठेवणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 4:27 AM