परभणीतील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 06:38 PM2018-04-13T18:38:00+5:302018-04-13T18:38:00+5:30

जिल्ह्याचे पालमकंत्री, खासदार, आमदार यांना डावलून भाजपाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला जात असल्याने या कार्यक्रमावर शिवसेना बहिष्कार टाकणार असल्याची माहिती खा.बंडू जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

Shivsena's boycott on the occasion of chief minister of Parbhani | परभणीतील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार

परभणीतील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे १९ एप्रिल रोजी विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर . पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर हे या दौऱ्याच्या अनुषंगाने तालुकानिहाय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खा.बंडू जाधव यांनी शुक्रवारी त्यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.

परभणी : जिल्ह्याचे पालमकंत्री, खासदार, आमदार यांना डावलून भाजपाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला जात असल्याने या कार्यक्रमावर शिवसेना बहिष्कार टाकणार असल्याची माहिती खा.बंडू जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे १९ एप्रिल रोजी विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याने प्रशासनाकडून त्यांच्या दौऱ्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर हे या दौऱ्याच्या अनुषंगाने तालुकानिहाय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खा.बंडू जाधव यांनी शुक्रवारी त्यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर तालुकास्तरावर समाधान शिबिरांतर्गत अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. या बैठका भाजपाच्या आहेत की शासकीय आहेत, हे एकदा स्पष्ट करावे. अशा बैठका घेणारे बबनराव लोणीकर कोण आहेत? ते संपर्कमंत्री असले तरी त्यांचे हे पद संवैधानिक नाही. ते पाणीपुरवठा मंत्री असल्याने त्यांच्याच विभागाच्या त्यांनी बैठका घेणे अपेक्षित आहे. परंतु, प्रशासकीय बाबीत त्यांची लुडबूड वाढली आहे. मुख्यमंत्र्यांचा परभणीत कार्यक्रम आहे आणि त्यासाठी पालकमंत्री, खासदार, आमदारांना विश्वासात घेतले जात नाही, त्यांना बोलाविले जात नाही, ही अत्यंत चुकीची बाब असून लोणीकर यांची ही मक्तेदारी शिवसेना सहन करणार नाही. मुंबईत मंत्रालयात लोणीकर भेटले. त्यानंतर त्यांनी तेथे पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या परभणी दोऱ्याची माहिती दिली. परंतु, आपल्याशी या संदर्भात तसूभरही संवाद साधला नाही. समाधान शिबीर असो की मुख्यमंत्र्यांचा दौरा. अशा कार्यक्रमांना संवैधानिक स्वरुप देऊन सर्व लोकप्रतिनिधींना त्यासाठी बोलाविणे अपेक्षित आहे. परंतु, लोणीकर यांच्याकडून असे केले जात नाही. या शिबिराच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणेचा वापर करुन ते भाजपाची पक्ष बांधणी करीत आहेत, असा आरोपीही त्यांनी यावेळी केला.

काँग्रेस- राष्ट्रवादीच्या काळातही अशी वाईट वागणूक आम्हाला दिली गेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर शिवसेना बहिष्कार टाकणार असून या कार्यक्रमात आपला विरोध दर्शविणार आहे. विरोधाचे स्वरुप कसे असेल हे नंतर सांगितले जाईल, असेही ते म्हणाले. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे. शिवाय ते चांगले नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी आपली कुठलीही तक्रार नाही, असेही खा.जाधव म्हणाले. मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला माणसे आणण्यासाठी तहसीलदारांनाच उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिरिक्त जिल्हाधिकारी निगरानी ठेवत आहेत. तीन वर्षापूर्वी लाभ दिलेल्या व्यक्तींनाही आताच लाभ दिल्याचे दाखवून या कार्यक्रमाला हजर करण्यास सांगितले जात आहे, असेही ते म्हणाले. 

भाजपा सरकारला शेतकऱ्यांविषयी कसलाही कळवळा नाही. कर्जमाफीची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. पीक विम्यात रिलायन्स विमा कंपनीशी जवळीक साधत शेतकऱ्यांचा बळी देण्याचे काम सुरु आहे. वीज बिल वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून वसुली केली जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. पत्रकार परिषदेस जिल्हाप्रमुख विशाल कदम यांची उपस्थिती होती. 

जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांची उचलबांगडी करा
जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचे चिरंजीव राहुल लोणीकर हे अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात? त्यांना बैठक घेण्याचा अधिकार कोण दिला? पाणीपुरवठामंत्री लोणीकर यांनी सत्तेचा दुरुपयोग करुन पूत्राला बैठक घ्यायला लावली. त्यामुळे लोणीकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी खा.जाधव यांनी केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल लोणीकर यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लोकप्रतिनिधींचा अपमान केला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांची उचलबांगडी करा, अशी मागणीही खा.जाधव यांनी यावेळी केली आहे.

Web Title: Shivsena's boycott on the occasion of chief minister of Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.