कोरोना संपताच तेराशे कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर येणार गंडांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:13 AM2021-06-26T04:13:42+5:302021-06-26T04:13:42+5:30
जिल्ह्यात मार्च - एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेला कर्मचारीवर्ग अपुरा पडत होता. ...
जिल्ह्यात मार्च - एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेला कर्मचारीवर्ग अपुरा पडत होता. त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाने १ हजार ३३४ नवीन कर्मचाऱ्यांना कंत्राटी स्वरूपात रूजू करून घेतले. मात्र, आता जून महिन्यापासून कोरोनाची लाट ओसरत असताना रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ९८ टक्के बेड रिक्त आहेत. सध्या केवळ १४ सेंटरमध्ये ६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे कंत्राटी स्वरूपात घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कोरोनाची लाट पूर्णपणे ओसरल्यानंतर गंडांतर येणार आहे. त्यामुळे जीवाची बाजी लावून कोरोना काळात जीव धोक्यात घालत रुग्णांवर उपचार करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आता पुन्हा एकदा नोकरी शोधण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचा कारभार म्हणजे गरज सरो वैद्य मरो असल्याची प्रचिती येत आहे.
दोनशे कर्मचाऱ्यांचे मानधनही थकले
आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी १ हजार ३३४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. या कर्मचाऱ्यांना कमीत कमी दहा हजार, तर जास्तीत जास्त ७५ हजार रुपयांचे मानधन देण्यात येत आहे. मार्च, एप्रिल, मे व जून चार महिने काम करणाऱ्या १ हजार ३३४ कर्मचाऱ्यांपैकी जवळपास दोनशे कर्मचाऱ्यांचे किरकोळ कागदपत्रांमुळे मानधन थकले आहे. त्यामुळे एकीकडे जीव धोक्यात घालून काम करावे लागत असताना दुसरीकडे नोकरी टिकण्याची शाश्वती नसताना मानधनही थकले आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचारी मेटाकुटीस आले आहेत.