चाऱ्याअभावी जनावरांची उपासमार; राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा दौरा २०० जनावरांच्या मुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2021 06:17 PM2021-08-06T18:17:40+5:302021-08-06T18:35:43+5:30
Governor Bhagat Singh Koshyari's Parabhani visit : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे ६ व ७ ऑगस्ट असे दोन दिवस परभणीच्या दौऱ्यावर आहेत.
परभणी: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari) दोन दिवसांच्या परभणी दौऱ्यावर आल्याने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ ( Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth) परिक्षेत्रात असलेले पशूवैद्यकीय महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे चाऱ्याअभावी दोनशे जनावरांची उपासमार होत असल्याची तक्रार या महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे ६ व ७ ऑगस्ट असे दोन दिवस परभणीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे सर्व कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिक्षेत्रातच आहेत. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच या परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात आले असले तरी विद्यापीठाच्या परीक्षेत्रात असलेल्या पशूवैद्यकीय महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना मात्र ओळखपत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना या परिसरात प्रवेश करण्यास पोलिसांनी प्रतिबंध केला आहे. परिणामी पशूवैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या २०० जनावरांना शुक्रवारी चारा मिळाला नाही. शनिवारीही दौऱ्यामुळे चारा मिळण्याची शक्यता नाही. शिवाय दररोज या पशूवैद्यकीय महाविद्यालयात परिसरात विविध गावांमधील २०० पेक्षा अधिक जनावरे उपचारासाठी येतात. त्यांनाही प्रतिबंध करण्यात आल्याने त्यांचीही गैरसोय झाली आहे.
हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेवजवळ झाला अपघातhttps://t.co/e80riDbdhV
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 6, 2021
या अनुषंगाने पशूवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कण्डेय यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. त्यात कृषी विद्यापीठ प्रशासनाने पशूवैद्यकीय महाविद्यालयास दुर्लक्षित केले. या महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना पास देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे १०० कर्मचाऱ्यांना कामावर जात आले नाही. तसेच पशूवैद्यकीय दवाखान्यात असलेल्या २०० पेक्षा अधिक जनावरांना चारा मिळालेला नाही, असेही या तक्रार अर्जात मार्कण्डेय यांनी म्हटले आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या अक्षम्य हालगर्जीपणामुळे या मुक्या जनावरांवर उपासमारीची वेळ आली असून शेकडो जनावरांना वेळेवर उपचारही मिळत नसल्याचे तक्रार अर्जात मार्कण्डेय यांनी म्हटले आहे. या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडून खुलासा मागून घ्यावा, अशीही मागणी तक्रार अर्जात केली आहे.