परभणी : जिल्ह्यातील पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या २ लाख शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हाभरात ठिकठिकाणी सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने आज सकाळी १० वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पीक विमा प्रकरणामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी २५ जूनपासून साखळी उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनाला व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत गुरुवारी बाजारपेठ बंद ठेवली होती. तर आज विविध पक्ष संघटनांच्या वतीने जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
तालुक्यातील पेडगाव फाटा येथे सकाळी १० वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तसेच परभणी- गंगाखेड रस्त्यावरील पोखर्णी फाटा येथे सकाळी ११ वाजता रास्तारोको करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी परभणी- गंगाखेड रस्त्यावर बैलगाड्या आणून उभ्या केल्या होत्या. पूर्णा तालुक्यातील झिरोफाटा येथे परभणी- वसमत या राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात आले.
सोनपेठ येथील शिवाजी चौकामध्ये तर मानवत येथील महाराणा प्रताप चौकामध्ये सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आंदोलन करण्यात आले. गंगाखेड शहराील परळी रस्त्यावरील महाराणा प्रताप चौकामध्ये आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोकोमध्ये सर्वच पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.