परभणी : एम.एस्सी. कृषी पदवीकेला व्यवसायिक पदवीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बुधवारपासून बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे. येथील विद्यापीठातील विद्यार्थी मागील एक वर्षांपासून या प्रश्नावर संघर्ष करीत आहेत.
शासन दरबारी निवेदने देऊनही विद्यार्थ्यांच्या मागणीकडे राज्य शासन गांभीर्याने घेत नसल्याने ५ फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा निर्णय घेतला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विद्यापीठ परिसरातून मोर्चा काढत विद्यार्थी कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत परिसरात एकत्र आले. या ठिकाणी घोषणाबाजी करून मागणी लावून धरली.
एम.एस्सी. कृषी पदवीला व्यावसायिक दर्जा द्यावा तसेच सर्व शिष्यवृत्त्या पूर्वलक्षी प्रभावाने लागू कराव्यात, पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता सुरू करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. त्याचप्रमाणे राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना कृषी विद्यापिठाचे शुल्क तिपटीने वाढविण्यात आले आहे. या विद्यापीठात शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहेत. एकीकडे शेतमालाला योग्य भाव मिळत नसताना आणि राज्यात दुष्काळी स्थिती असताना राज्य शासनाने मात्र कृषी अभ्यासक्रमाच्या शुल्कात तिप्पट वाढ केली, हा विद्यार्थ्यांवर अन्याय असून हे शुल्क कमी करावे, अशीही विद्यार्थ्यांची मागणी आहे. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमाचे चारशेहून अधिक विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.