स्वत:वर विश्वास ठेवून प्रयत्न केल्यास यश निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:12 AM2021-06-30T04:12:20+5:302021-06-30T04:12:20+5:30
परभणी : स्वतःवर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश निश्चित मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीने प्रयत्न ...
परभणी : स्वतःवर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश निश्चित मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन पुणे येथील पोलीस उपनिरीक्षक अरुण डोंबे यांनी केले आहे.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजित ७ दिवसीय ऑनलाइन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात अरुण डोंबे बोलत होते. ‘पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा अभ्यास’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना आपले विश्व स्वतः तयार करण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. अभ्यासासाठी सर्वत्र सुविधा उपलब्ध झाल्या असून स्मार्ट बनून गावातील घरात किंवा शेतात बसूनही स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकता. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी औरंगाबाद, पुणे, मुंबई अशा शहरात जाऊन वर्ग लावण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये असलेली नकारात्मकता आणि न्यूनगंड काढून टाकून स्वतःवर विश्वास ठेवावा. अभ्यासामध्ये सातत्य ठेवून प्रामाणिकपणे तसेच विषय व्यवस्थितपणे समजून घेऊन अभ्यास करावा. संकल्पना समजून घेऊन स्वतःची मते आपल्याला बनवता आली पाहिजेत. त्याचे फायदे परीक्षेसह मुलाखतीसाठी होतात. मागील पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांचे विश्लेषण केल्याने अभ्यासामध्ये गती तसेच आत्मविश्वास निर्माण होतो, असे अरुण डोंबे यांनी सांगितले.
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी ग्राउंडची तयारी, संपूर्ण अभ्यास आणि त्याबद्दलचे करावयाचे नियोजन याविषयी डोंबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ. रामानंद व्यवहारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शन शिबिराचे सहसमन्वयक प्रा. अभिजित भंडारे यांनी प्रयत्न केले.