कोरोना नियंत्रण मोहिमेत काम करणाऱ्या शिक्षकांना विमा कवचापासून ठेवले वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:13 AM2021-04-29T04:13:24+5:302021-04-29T04:13:24+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सध्या राज्यभर धुमाकूळ घातला आहे. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सध्या राज्यभर धुमाकूळ घातला आहे. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे, कोरोना प्रतिबंधक लसीकरण जनजागृती, चेक पोस्टवर बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींची तपासणी करणे, पन्नास वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींचे सर्वेक्षण आदी महत्त्वाची कामे जिल्हा परिषद व खासगी शाळांमधील शिक्षक करीत आहेत. कन्टेन्मेंट झोनमध्ये जाऊन प्रत्यक्ष ही कामे शिक्षकांना करावी लागत आहेत. ही कामे करताना अनेक शिक्षकांना कोरोनाची लागणही झालेली आहे. वेळप्रसंगी या शिक्षकांचा जीव धोक्यात येतो. किंबहुना काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे या शिक्षकांना शासनाने विमा कवच देणे आवश्यक होते; परंतु याच मुख्य बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे या शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. विशेष म्हणजे या शिक्षकांना प्रतिबंधात्मक साहित्य देखील देण्यात येत नाही. अनेक शिक्षक स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करून हे साहित्य खरेदी करीत आहेत. त्यामुळे या शिक्षकांना राज्य शासनाने विम्याचे कवच देणे आवश्यक आहे. तरच राष्ट्रीय कार्य करणाऱ्या या शिक्षकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होईल.
प्रशासनाचे दुर्लक्ष कायम
कोरोना कालावधीत विविध कामे करण्यासाठी शिक्षकांना अधिकृत जिल्हा परिषदेकडून आदेश देण्यात आलेले आहेत; परंतु या शिक्षकांना सदरील काम करीत असताना घ्यावयाच्या काळजीसाठी लागणारे साहित्य देण्यात आलेले नाही. आदेश काढल्यानंतर जे शिक्षक हे काम करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याची ताकीद वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिली जाते; परंतु या शिक्षकांना विमा कवच मिळाले पाहिजे यासाठी कोणी आग्रही राहत नाही. त्यामुळेच शिक्षकांमध्ये याबाबत नाराजी आहे.
शिक्षक धोका पत्करून राष्ट्रीय कार्य करीत आहेत. त्यामुळे त्यांना ५० लाखांपर्यंतचे विमा कवच द्यावे. तसेच प्रतिबंधात्मक साहित्य द्यावे. चेकपोस्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आवश्यक त्या सुविधा देण्यात याव्यात.
- एम. ए. आघाव, पाथरी
शिक्षण सेवकही कोरोनाकाळात प्रशासनास मदत करीत आहेत. त्यामुळे त्यांना पीपीई किट,मास्क आदी साहित्य दिले पाहिजे. कर्तव्यावरील शिक्षकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबांची वाताहत होऊ नये म्हणून त्यांना ५० लाखांचे विमा कवच देणे आवश्यक आहे.
- भास्कर रेंगे, शिक्षणसेवक, पाथरी
कोविडमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामे शिक्षकांना करावी लागत आहेत. ही धोकादायक कामे करत असताना जीवितहानी होऊ शकते. म्हणून या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना शासनाकडून विमा कवच मिळणे गरजेचे आहे.
- दत्ता पवार, शिक्षक, वाणी संगम
कोरोना साथरोग नियंत्रण मोहिमेत जिल्ह्यातील शिक्षकांची संख्या
३६७६