कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून वारंवार जाहीर करण्यात येत असलेल्या संचारबंदी व लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील बससेवा कधी बंद तर कधी सुरू आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे. ही घट भरून काढण्यासाठी २२ मार्चपासून अत्यावश्यक सेवेसाठी एसटी बससेवा सुरू ठेवण्याचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले होते; मात्र प्रवासी मिळत नसल्याचे दिसून आले.
इतर आगारावर मदार
जिल्ह्यातील चार आगारांमधील बससेवेला अत्यावश्यक सेवेसाठी प्रवासी मिळत नसले तरी इतर आगारातून येणाऱ्या बससेवेचा आधार जिल्ह्यातील काही प्रवासी घेत आहेत. त्यामुळे पर जिल्ह्यातील आगरातून सुटणाऱ्या बसेसमुळे जिल्ह्यातील बससेवा ठप्प आहे. महामंडळातील उत्पादनात होणारी घट भरून काढण्यासाठी अटींसह बससेवा सुरू होणे अपेक्षित आहे.
निर्बंधाचा बसतोय फटका
जिल्ह्यातून अत्यावश्यक सेवेसाठी नागरिक ये-जा करतात; मात्र एसटी महामंडळाच्या बसचा वापर करण्यासाठी राज्य शासनाने घातलेल्या अटी व निमयांचे पालन करावे लागते. त्यामुळे प्रवाशांनी पाठ फिरविली आहे.
माल वाहतूक सेवा सुरू
परभणी जिल्ह्यातील पाथरी, गंगाखेड, जिंतूर व परभणी या चार आगारातून अत्यावश्यक सेवेसाठी प्रवासी मिळत नसल्याने प्रवासी वाहतूक बंद आहे; मात्र लॉकडाऊनच्या काळात माल वाहतूक सेवा मात्र जोरात सुरू आहे. परिणामी या माल वाहतूक सेवेतून एसटी महामंडळाच्या उत्पादनवाढीस हातभार लागत आहे, तसेच प्रवाशांचा मालही सुरक्षित पोहोचविला जात आहे.
राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर अत्यावश्यक सेवेसाठी एसटी बससेवा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाऱ्या चारही आगारांमध्ये बस प्रवाशांच्या सेवेसाठी तयार आहेत; मात्र मागील महिनाभरापासून प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने तसेच चारही आगारातून प्रवाशांची मागणी नसल्याने बससेवा ठप्प आहे. मागणी आल्यास प्रवाशांची सोय केली जाईल.
-मुक्तेश्वर जोशी, विभागीय नियंत्रक, परभणी.