गंगाखेड शहर व परिसरात घडणाऱ्या चोरी, दुकान फोडी, मोबाईल पळविणे, घरफोडीच्या काही घटनांतील चोरटे गजाआड झाले असले तरी या चोरट्यांवर पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे ३ जानेवारी रोजी रात्री ९ ते ९:३० वाजे दरम्यान शहरातील शनिवार बाजार परिसरात मच्छी मार्केटमध्ये घडलेल्या चार दुकान फोडीच्या घटनेवरून समोर आले आहे. रविवार रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास फीश मार्केटमधील व्यापाऱ्यांनी आपली टिन शेडच्या अलमारीत असलेली दुकाने बंद करून घरी गेले असता रात्री ९ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने सोबत आणलेल्या लोखंडी गजाने या मार्केट मधील शेख महेबूब उर्फ बाबू भाई यांच्या दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील साहित्य काढून घेतले. त्यानंतर नादानबी शेख जाफर यांच्या दुकानाचे कुलूप तोडून दुकानात ठेवलेल्या दहा किलो बोंबील माशी चोरून नेली. सय्यद दस्तगीर सय्यद फरीद यांच्या माशीच्या दुकानाचे कुलूप तोडले. तसेच याच परिसरात असलेल्या चिकन शॉप चालक फकीरसाब शेख खाजा यांनी दुकानाजवळ जाऊन पाहणी केली असता एक जण लोखंडी पारने कुलूप तोडत असल्याचे त्यांना दिसले. ए कोण आहे असे म्हणून त्यांनी त्यास हटकताच चोरट्याने लोखंडी पार तिथेच सोडून धूम ठोकली. रात्री ९ ते ९:३० वाजेच्या सुमारास दुकाने फोडण्याचा प्रयत्न झाल्याने याची माहिती समजताच जमादार रंगनाथ देवकर, पो. ना. एकनाथ आळसे यांनी घटनास्थळी जाऊन फुटलेल्या दुकानांची पाहणी करत लोखंडी पार जप्त केली. त्यानंतर सपोनि राजेश राठोड, सपोनि विकास कोकाटे, पो.ना. अनिल भराडे आदींनी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी सोमवार रोजी सायंकाळ पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले असून या चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांसह शहरवासीयांतून होत आहे.
शनिवार बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:51 AM