: दंडाचा दिला इशारा
पालम : नगरपंचायत प्रशासनाने शहरातील विविध प्रतिष्ठाने व दुकानांवर धाडी टाकून १० जानेवारी रोजी ३ क्विंटल ५० किलो प्लास्टिक जप्त केले. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियानाच्या अनुषंगाने नगरपंचायत व पोलीस प्रशासनाच्या वतीने प्लास्टिक जप्तीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी नगर पंचायतीकडून ५ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकात कार्यालयीन अधीक्षक कानडे, अभियंता रफत खान, लेखापाल लोंढे, सय्यद हुसेन, पठाण खालेद, सय्यद आरेफ, गजानन क्षीरसागर, शेख साजेद, विष्णूपंत रोकडे, सय्यद मुसा, रघुनाथ रोकडे, मोतीराम शिंदे, अनिल शिंदे यांचा समावेश आहे. या पथकाने १० जानेवारी रोजी शहरातील विविध चौकातील दुकाने व प्रतिष्ठानावर अचानक धाडी टाकल्या. या धाडीत तीन क्विंटल ५० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. प्लास्टिक जप्त केलेल्या व्यावसायिकांना ५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा नगरपंचायतीचे प्रशासक सुधीर पाटील यांनी दिली.