Video : थरारक ! गोळीबार करणाऱ्यावर ६ जणांचा तलवारीचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 06:00 PM2021-06-25T18:00:41+5:302021-06-25T18:03:42+5:30
after firing sword attack of 6 people on the shooter in Parabhani : या प्रकरणात पोलिसांनी एकास अटक केली असून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत
परभणी : शहरातील दर्गा रोड भागात एकाने गोळीबार केल्याची घटना २४ जून रोजी दुपारी २.३० च्या सुमारास घडली होती. या घटनेनंतर गोळीबार करणाऱ्यावर त्याच्या घरासमोर जाऊन ६ जणांनी तलवारीने हल्ला केला. या दोन घटनात कोतवाली पोलीस ठाण्यात वेगवेगळे २ गुन्हे दाखल झाले आहेत. यात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यास अटक केली आहे, तर त्याचा साथीदार दवाखान्यात उपचार घेत आहे. तलवारीने मारहाण करणारे दुसऱ्या गटातील सर्व ६ आरोपी मात्र फरार आहेत. ( Sword attack of 6 people on the shooter in Parabhani )
परभणी शहरातील दर्गा रोड भागात गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातून शेख इम्रान शेख अमीर व शेख सलीम शेख अमीर (रा. एकमिनार मस्जिद) हे जात होते. यावेळी शेख इम्रान याने जुन्या वादातून बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगून एकावर गोळीबार केला. मात्र, समोरील व्यक्ती पळून गेल्याने पिस्टलमधील गोळी एका कारला (एमएच १२ पीक्यू ०५०३) लागली. यामध्ये शेख इस्माईल शेख युनूस (रा.वसमत, जि.हिंगोली) यांच्या वाहनांचे नुकसान झाले. यावेळी एका घराच्या पाठीमागून मोहम्मद रिजवान, अली चाऊस, रिजवान खान, मोहम्मद रिजवान उर्फ एमआर यांचे वडील, झिया व अन्य एक इसम आले. त्यातील एकाजवळ तलवार होती. त्याने व नंतर त्याच्याकडून तलवार घेऊन इतरांनी शेख इम्रान शेख अमीर व शेख सलीम शेख अमीर यांच्यावर हल्ला केला. यात शेख इम्रान हा गंभीर जखमी झाला. यानंतर मारहाण करून आरोपी पळून गेले.
परभणीत थरार ! गोळीबार करणाऱ्यावर ६ जणांचा तलवारीचा हल्ला, ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात #Attackpic.twitter.com/9XnlwRqewf
— Lokmat (@MiLOKMAT) June 25, 2021
या दोन्ही घटनेमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी शेख सलीम शेख अमीर यास अटक केली आहे तर अन्य एक जण दवाखान्यात उपचार घेत आहे. तलवारीने मारहाण केलेल्या घटनेतील सर्व सहा आरोपी शुक्रवारी दुपारपर्यंत फरार असल्याची माहिती कोतवालीचे सहायक पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड यांनी दिली. या दोन्ही घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुरनर करीत आहेत. दरम्यान, ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.