परभणी: अवैद्य वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूलच्या कर्मचाऱ्यांनी पकडून तहसील कार्यालय परिसरात लावले असता, ते अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना सेलू येथे घडली असून, याप्रकरणी पाच दिवसानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेलू येथील महसूल विभागाच्या पथकाने २० मे रोजी पिंपरी खुर्द ते शिराळा रोडवरील दोन्ही गावाच्या शिव रस्त्यावरील पुलाजवळ अवैधरीत्या एक ब्रास वाळू घेऊन जाणारे व पासिंग नंबर खोडलेले महिन्द्रा कंपनीचे एक ट्रॅक्टर पकडले होते. यावेळी ट्रॅक्टर चालक पथकास पाहून पळून गेला होता. त्यावेळी महसूल कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर जप्त करून ते सेलू येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आणून लावले होते. २ जून रोजी सकाळी सदरील ट्रॅक्टर जागेवर दिसून आले नाही. त्यानंतर ७ जून रोजी तलाठी अविनाश अरुण जोगे यांनी सेलू पोलिसात याबाबत फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, २ जून रोजी तहसील कार्यालयाच्या आवारातून ट्रॅक्टर चोरी झाल्यानंतर महसूल विभागाला गुन्हा दाखल करण्यात ७ जून का उजाडला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव होता का? अशी चर्चा सुरू झाली आहे.