जिंतूर: तालुक्यातील मोजे पुंगळा तांडा येथील दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू पावल्याची घटना शुक्रवारी (दि.६) सायंकाळी सहा वाजता उघडकीस आली आहे. गोविंद संजू राठोड (9) आणि युवराज कृष्णा चव्हाण (११) अशी मृत मुलांची नावे आहेत.
पुंगळा गावापासून उत्तर दिशेला पुंगळा तांडा आहे. तांड्याच्या बाजूलाच एक लघु सिंचन तलाव आहे. या तलावात पोहण्यासाठी गोविंद संजू राठोड (9) आणि युवराज कृष्णा चव्हाण (११) ही दोघे इतर मुलांसोबत गेले होते. पोहोत असताना अचानक गोविंद आणि युवराज बुडाले. ही पाहून घाबरलेल्या इतर मुलांनी गावात जाऊन पालकांना माहिती दिली. पालक आणि ग्रामस्थांनी तलावावर बचावासाठी धाव घेतली. मात्र, काही वेळाने दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले. घटनेमुळे तांडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी आमदार विजय भांबळे यांनी दोन्ही कुटुंबाचे सांत्वन केले.