पोकरातून शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन कोटीचे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:13 AM2021-06-17T04:13:14+5:302021-06-17T04:13:14+5:30
शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायतशीर करण्यास साहाय्य करण्याच्या उद्देशाने कृषी विभागाच्या ...
शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायतशीर करण्यास साहाय्य करण्याच्या उद्देशाने कृषी विभागाच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये गाव हा प्रमुख घटक असून गावातील जमीन धारणा असणाऱ्या शेतकऱ्यांना व शेतकरी गटांना प्रकल्पातील विविध घटकांचा अनुदानावर लाभ घेता येतो. त्यामुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी ही योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीला बळकटी व आर्थिक बळ देणारी व शेतकऱ्यांना सक्षम करणारी योजना म्हणून समोर येत आहे .प्रकल्पातील समावेश असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक लाभ होत असून मानवत तालुक्यातील २२ गावांमध्ये पोकरा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये ताडबोरगाव परिसरातील ११ गावांचा समावेश आहे. यात मार्चअखेरपर्यंत या ११ गावांमधील विविध घटकांसाठी कामे पूर्ण करून अनुदानासाठी देयके सादर केलेल्या शेतकऱ्यांना २ कोटी ९ लाख ४८ हजार ६०७ रुपयांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे हि योजना यशस्वी होताना दिसत असून शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
या योजनांचा होतो फायदा
कुक्कुटपालन ,सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे, ठिबक सिंचन, अस्तरीकरण ,मत्स्यपालन, तुषार सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, मोटार पंप ,पाणी उपसा साधन, पाईप लाईन, नवीन विहीर, विहिरींचे पुनर्भरण, शेडनेट ,पॉलिहाऊस, ग्रीन नेट ,ग्रीन नेट मधील पालेभाज्या, परसबागेतील कुक्कुटपालन ,रेशीम उद्योग ,मधुमक्षिकापालन ,गांडूळ खत उत्पादन युनिट, यासह विविध योजनांचा लाभ घेता येतो .
या गावांचा समावेश
मानवत तालुक्यातील ताडबोरगाव, कोल्हा, नरळद, राजुरा, कोथाळा, सोमठाणा, देवलगाव आवचार, मानवतरोड, शेवडी जहागीर, आटोळा, पार्डी टाकळी या गावातील शेतकऱ्यांना विविध घटकांतर्गत अनुदानाचा लाभ मिळाला आहे .
मानवत तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने पोकरा योजना राबविल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत आहे.
प्रदीप कच्छवे, तालुका कृषी अधिकारी, मानवत.
पोकरा योजनेतून अनुदानावर शेडनेट उभारले असून त्यात घेतलेल्या भाजीपाला पिकांमधून मोठा आर्थिक फायदा झाला आहे .
संताबाई भास्कर बारहाते ,शेतकरी नरळद
गावनिहाय मिळालेले अनुदान
नरळद - 7209786
पार्डी टाकळी- 402234
सोमठाणा - 3445712
देवलगाव अवचार - 1813425
ताडबोरगाव- 1568531
कोथाळा - 301908
आटोळा- 1667448
कोल्हा- 4117580
शेवडी जहागीर- 332673
राजुरा- 89310