सोनपेठः तालुक्यातील ३९ पैकी पाच ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्यामुळे आता ३४ गावात निवडणुका होत आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान असल्याने गाव पातळीवरील राजकीय वातावरण तापले आहे. बहुतांश ठिकाणी दुरंगी तिरंगी लढती होत असल्याचे पहावयास मिळत आहे. गावावर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी स्थानिक नेते मंडळींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तालुक्यातील कोरटेक, मोहळा, गंगा पिंपरी, पोहंडूळ या पाच ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. तालुक्यातील डिघोळ, धमोणी, गवळी पिंपरी, खपट पिंपरी, नरवाडी, निमगाव, कोठाळा, बोंदरगाव, शेळगाव, सायखेड, वंदन, वडगाव, लोहीग्राम, उक्कडगाव, थडी पिंपळगाव आदी ३४ गावात १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत आपल्या पॅनलचे वर्चस्व निर्माण व्हावे म्हणून सर्वच पॅनल प्रमुख यांनी जोरदार तयारी चालवली आहे. त्यामुळे गावागावात चुरशीच्या व लक्षवेधी लढती होणार आहेत. गावागावात प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. दिवसेंदिवस रंगत वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.