परभणी: सार्वजनिक वितरण योजनेंतर्गत धान्य पुरवठा करण्यात तांत्रिक अडचणी आल्याने राज्य शासनाने पोर्टेबिलिटीचा पर्याय खुला करुन दिला असून नोव्हेंबर अखेर जिल्ह्यातील ८ हजार ६२४ कार्डधारकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.
सार्वनजिनक वितरण प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील कार्डधारकांना अल्पदरामध्ये अन्न-धान्याचा पुरवठा केला जातो. अन्न सुरक्षा योजना, दारिद्र्य रेेषेखालील लाभार्थी अशा गटात वर्गीकरण करुन लाभार्थ्यांना धान्य वितरित केले जाते. आतापर्यंत गहू, तांदुळ, साखर आणि दाळ, तेल आदी खाद्य पदार्थांचा पुरवठा केला जातो. या प्रक्रियेमध्ये अनेक वेळा रेशन दुकानदारांच्या संदर्भात तक्रारी होतात. वेळेवर दुकान सुरु राहत नाही. संपूर्ण रेशन वितरित होत नाही. या तक्रारींबरोबरच काही ठिकाणी लाभार्थ्यांच्या अडचणी असतात. त्यामध्ये रेशन दुकान घरापासून दूर असणे, एकाच रेशन दुकानावर अनेक लाभार्थी जोडल्याने धान्य प्राप्त करण्यास विलंब लागणे यासह काही लाभार्थ्यांना इतर शहरामध्ये स्थलांतरित व्हावे लागते. अशा वेळी या लाभार्थ्यांना रेशनचा पुरवठा व्हावा, या उद्देशाने पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या सोईच्या केंद्रातून अन्न-धान्य उपलब्ध करुन घेण्यात येते. नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात ८ हजार ६२४ लाभार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. या लाभार्थ्यांनी ११ हजार ६४ ट्रान्झेंक्शन केले आहेत. परभणी तालुक्यात सर्वाधिक ३ हजार २६७ कार्डधारकांनी पोर्टेबिलिटीचा लाभ घेतला. तर जिंतूर तालुक्यात १ हजार ५३१ आणि सेलू तालुक्यातील १ हजार २०८ कार्डधारकांनी पोर्टेबिलिटी सुविधेचा लाभ घेतला आहे. या सुविधेमुळे कोणत्याही तांत्रिक बाबीवरुन त्या त्या महिन्यात रेशनचा पुरवठा झाला नाही, असे होणार नाही. प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत रेशनचे धान्य उपलब्ध होणार असून लाभार्थ्यांची आतापर्यंत होत असलेली गैरसोय दूर झाली आहे.
या आहेत तक्रारीरेशन दुकानदारांच्या संदर्भात अनेक तक्रारी असतात. त्यामध्ये बहुतांश तक्रारी संपूर्ण रेशनचे वाटप होत नाही. रेशनदुकान बंद राहते, लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे रेशन कमी प्रमाणात दिले जाते. जाणीवपूर्वक यादीतून नाव वगळले जाते. रेशन दुकानदार मनमानी करीत आहे. अशा अनेक स्वरुपाच्या तक्रारी ग्रामीण भागातून पुरवठा विभागाकडे दाखल होतात.
मोफत धान्यामुळे वाढल्या तक्रारीकोरोनाच्या संकट काळात गोरगरिबांना मोफत तांदुळ व दाळ वितरित करण्यात आली. हे धान्य मिळाले नसल्याच्या तक्रारी त्या काळात होत्या. तसेच सेलू, मानवत आणि जिंतूर या ठिकाणी काळ्या बाजारात जाणारे धान्य पोलिसांनी कारवाई करीत पकडले होते. रेशनच्या धान्यासंदर्भात तक्रारींची संख्या अधिक आहेत. स्वस्तधान्य वितरण प्रणालीअंतर्गत जिल्हा पुरवठा विभागाकडे किती तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी किती तक्रारींचा निपटारा झाला. तक्रारींचे स्वरुप काय होते, याची माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा संपर्क साधला असता नेहमीप्रमाणे त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुरवठा विभागातील तक्रारींच्या अनुषंगाने झालेली कारवाई व इतर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
तालुकानिहाय लाभार्थीपरभणी ३२६७गंगाखेड ७५०जिंतूर १५३१मानवत ५४५पालम २९६पाथरी ३३२पूर्णा १८४सेलू १२०८सोनपेठ ५११एकूण ८६२४
३१३११७ - एकूण रेशनकार्डधारक८६२४ - पोर्टेबिलिटीचा लाभ घेतलेले