दीड लाख नागरिकांवर अडकली लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:27 AM2021-05-05T04:27:56+5:302021-05-05T04:27:56+5:30
परभणी : जिल्ह्यात कोरोना लसीचा खडखडाट निर्माण झाला असून, आतापर्यंत केवळ १ लाख ६९ हजार नागरिकांनाच लसीकरण झाले आहे. ...
परभणी : जिल्ह्यात कोरोना लसीचा खडखडाट निर्माण झाला असून, आतापर्यंत केवळ १ लाख ६९ हजार नागरिकांनाच लसीकरण झाले आहे. दोन दिवसांपासून लसीअभावी जिल्ह्यातील मोहीम ठप्प पडली आहे.
कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यावर लसीकरण हाच पर्याय असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाल्यानंतर लसीकरणासाठी मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडू लागले; परंतु याच काळात अल्प प्रमाणात साठा उपलब्ध होत असल्याने लसीकरण मोहिमा वारंवार बंद पडू लागल्या. मागच्या आठवडाभरापासून तर या मोहिमेत मोठा खंड पडला आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याला कोविशिल्डचे ७ हजार डोस प्राप्त झाले. मात्र, ही लस केवळ अठरा वर्षांपुढील नागरिकांसाठी राखून ठेवली. परभणी शहरातील पाच केंद्रांवर ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर लस दिली जात आहे. त्यामुळे ४५ वर्षांपुढील सर्व नागरिकांचे लसीकरण सध्यातरी ठप्प आहे. विशेष म्हणजे, परभणी शहर वगळता जिल्ह्यात इतर ठिकाणी १८ वर्षांपुढील नागरिकांनाही लस उपलब्ध होत नाही. सोमवारपर्यंत उपलब्ध होणाऱ्या लसीची माहितीच प्रशासनाकडे नाही. त्यामुळे लसीकरण सत्र कसे चालवायचे? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील लसीचा साठा जवळपास संपुष्टात आला असून, ४५ वर्षांपुढील अनेक नागरिक केंद्रांवर चकरा मारून त्रस्त आहेत. सोमवारी दिवसभरात परभणी शहरातील पाच केंद्रांवर लसीकरण झाले.
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६९ हजार ३३ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १८ लाखांवर आहे. लोकसंख्येच्या तुलनेत ९.३९ टक्क्यांपर्यंत लसीकरण झाले आहे.
दुसरा डोस केव्हा येणार?
जिल्ह्यातील सुमारे ११ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेऊन कोरोनापासून स्वतःला सुरक्षित केले आहे. त्यामुळे सुमारे १ लाख ५७ हजार ९८९ नागरिक दुसऱ्या डोसपासून अजूनही वंचित आहेत. या नागरिकांना दुसरा डोस केव्हा मिळणार? याची प्रतीक्षा लागली आहे. अनेकांच्या दुसऱ्या डोसची तारीखही निघून गेली असून, लसीसाठी केंद्रांवर दररोज नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
कोव्हॅक्सिनची लस होईना उपलब्ध
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत्या. त्यामुळे अनेक नागरिकांनी कोव्हॅक्सिनची लस घेतली आहे. मात्र, मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यामध्ये कोव्हॅक्सिनचा साठा उपलब्ध नाही. त्यामुळे कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेणारे आता काळजीत आहेत.