५ केंद्रांवर केवळ महिलांसाठी लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:17 AM2021-03-08T04:17:36+5:302021-03-08T04:17:36+5:30
परभणी : जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील ५ केंद्रांवर ८ मार्च रोजी महिलांसाठी कोरोना लसीकरण शिबिर घेतले जाणार आहे. जिल्ह्यात ...
परभणी : जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील ५ केंद्रांवर ८ मार्च रोजी महिलांसाठी कोरोना लसीकरण शिबिर घेतले जाणार आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारी रोजी कोरोनाची लस उपलब्ध झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्धांना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जेष्ठ नागरिकांना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सर्वच शासकीय केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागत आहेत. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जात असून, यानिमित्ताने केवळ महिलांसाठी विशेष लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ५ केंद्रांवर त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यात परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, सेलू येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र एरंडेश्वर, प्राथमिक आरोग्य केंद्र शेळगाव आणि महानगरपालिकेच्या जायकवाडीतील आरोग्य केंद्रातील केवळ महिलांसाठी लसीकरण सत्र राबविले जाणार आहे. या ठिकाणी ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील गंभीर आजाराच्या महिला आणि ६० वर्षांवरील महिलांना लसीकरण करता येणार आहे.