लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एक-एक मत मोलाचे असल्याने गावपुढारी आता स्थलांतरित मतदारांच्या शोधात जिल्ह्याबाहेर फिरु लागले आहेत. पुणे, आळंदी, औरंगाबाद या महानगरांमधील मतदारांना भेटण्यासाठी गावपुढारी गेले आहेत.
पाथरी तालुक्यात ४२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यापासून ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या दिवशी चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे १५ जानेवारी रोजी तालुक्यातील ३८ ग्रामंपचायतींच्या ६७९ जागांसाठी निवडणुका होत आहेत. गावागावात प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. डिजिटल हायटेक प्रचारासोबतच गाव पातळीवर पुढारी वैयक्तिक भेटीगाठींवर भर देऊ लागले आहेत. ग्रामीण भागातील अनेक मतदार वर्षानुवर्षे कामानिमित्त बाहेरगावी राहतात. मात्र, त्यांची नावे गावातील मतदार यादीत समाविष्ट असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी या मतदारांचा शोध घेतला जातो. त्यासाठी पुढारी प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन टाेकन देऊन या मतदारांची जाण्या-येण्याची सोयही करत आहेत. त्यामुळे ग्रामंपचायत निवडणूक अधिकच खर्चिक बनली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने गावपुढारी मतदारांच्या शोधात फिरत आहेत. कोणी ऊसाच्या फडावर असलेल्या कामगारांना भेटून आपल्याच पॅनेलला मतदान करण्याचे सांगत आहेत तर कोणी महानगरांमध्ये जावून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.
गुप्त संदेश भेटूनच
निवडणूक काळात कोण कोणाला भेटत आहे, यावर बारकाईने नजर ठेवली जात आहे. मोबाईलवर कोणाला काही संदेश देता येत नाही. कारण आजकाल मोबाईल रेकॉर्डिंगमुळे चर्चा घडू लागल्या आहेत. त्यामुळे अज्ञातस्थळी भेटून गुप्त संदेश महत्वाचे ठरू लागले आहेत.