प्रसाद आर्वीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ४७० गावांवर पाणीटंचाईचे संकट ओढावू शकते, असा अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला आहे़ त्यामुळे या गावांमध्ये आता टंचाई निवारणाची कामे हाती घेण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे़ जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा ३१ टक्के पाऊस कमी झाला आहे़ परिणामी जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असल्याचे दिसत आहे़मागील वर्षीच्या पावसाळी हंगामात सरासरी एवढा पाऊस पडण्याचे भाकीत वर्तविले असले तरी प्रत्यक्षात पावसाने पाठ फिरविली़ पालम, जिंतूर, पाथरी या तालुक्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले़ परिणामी भूजल पातळीत वाढ झाली नाही़ त्यामुळे आगामी काळात या तालुक्यांना पाणीटंचाईच्या संकटातून जावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यातील भूजल पातळीचा आढावा सातत्याने घेतला जाता़े़ झालेले पर्जन्यमान आणि निरीक्षण विहिरींच्या नोंदी यावरून संभाव्य टंचाईग्रस्त गावांची संख्या जाहीर केली जाते़ यावर्षीही भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यात केलेल्या निरीक्षणाचा अहवाल घोषित केला आहे़ ज्या गावांमध्ये भूजल पातळीत मोठी घट झाली आहे़ अशा गावांची यादी तयार करण्यात आली असून, जिल्ह्यातील तब्बल ४७० गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, असा अहवाल या विभागाने वर्तविला आहे़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ४७० गावे हे संभावित टंचाईग्रस्त गावे म्हणून जाहीर केली आहेत़ भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील ४१ गावांमध्ये सद्यस्थितीला पाणीटंचाई आहे़ जानेवारी ते मार्च २०१८ या तीन महिन्यांमध्ये १०६ गावांत पाणीटंचाई निर्माण होवू शकते तर एप्रिल ते जून या तीन महिन्यांत टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत ३२३ गावांची भर पडण्याची शक्यता आहे़ त्यामुळे ही सर्व गावे संभाव्य पाणीटंचाईग्रस्त असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे़आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये परभणी तालुक्यातील ३, पूर्णा ८ आणि पालम तालुक्यातील सर्वाधिक ३० गावांत टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे़ संभाव्य पाणीटंचाई जानेवारी ते मार्च या काळात पालम तालुक्यातील ४१, पाथरी २७, सेलू १३, परभणी १७ आणि जिंतूर तालुक्यातील ८ अशा १०६ गावांत उद्भवण्याची शक्यता आहे़ तर एप्रिल ते जून या तीन महिन्यांत टंचाईचे संकट आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, या काळात सेलू तालुक्यातील ६०, जिंतूर ५६, सोनपेठ ४४, गंगाखेड ५६, पूर्णा २२, मानवत ४३ आणि पाथरी तालुक्यातील २२ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे़
परभणी जिल्ह्यात ४७० गावांवर पाणीटंचाईचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:38 AM