परभणीत प्रमुख रस्त्यांसह सर्वच रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. यातच प्रमुख महामार्गवगळता अन्य मार्गावर वाहने चालविणे कठीण आहे. तरीही अनेक वाहनधारक जोरात वाहने चालवून रस्त्याच्या मधोमध स्टंट करतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. यामध्ये शहर वाहतूक शाखा अशा वाहनधारकांना दंड लावत आहे, तरीही त्यांना आवर घालणे गरजेचे आहे.
रात्री उशिरा या ठिकाणी होते स्टंटबाजी
शहरातील विसावा कॉर्नर, पाथरी रोड, जिंतूर रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, स्टेडियम रस्ता, वसमत रोड या भागांमध्ये रस्त्यावर अतिवेगाने वाहने चालविण्याचे प्रमाण अधिक आहे. शहरात धूम स्टाईल वाहने चालविली जात असली तरी स्पोर्ट्स बाईक मात्र बोटावर मोजण्याइतक्या आहेत. यामध्ये बुलेट व अन्य वाहनांवर छोटे-मोठे स्टंट केले जातात.
दंड भरायचा अन सुटका करून घ्यायची
शहरात वाहनधारकांना दंडात्मक कारवाई नवीन नाही. नियम मोडल्यानंतर अगदी १०० रुपयांपासून ते १ हजार रुपयांपर्यंत दंड भरणारे अनेक आहेत. मागील वर्षभरात २०२०मध्ये २० हजार ७७९ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये ५३ लाख २४ हजार ८५० रुपये दंड वसूल करण्यात आला. यात अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या ४७७ वाहनांवर कारवाई करण्यात आली, तर मोबाईलवर बोलणारे ६६३ व ट्रिपल सीट फिरणाऱ्या ५३२ वाहनधारकांचा समावेश आहे.
...तर जीवावर बेतू शकते
शहरात मुख्य रस्त्यांवर वेगाने वाहन चालविल्यामुळे इतरांच्या जीवाला धोका होऊ शकतो, याची जाणीव अनेक वाहनधारकांना नाही. यामध्ये युवकांचे प्रमाण अधिक आहे. वसमत रस्त्यावर तसेच जिंतूर रस्त्यावर छोटे-मोठे अपघात यापूर्वी घडले आहेत. यामुळे धूम स्टाईल वाहन चालवून इतरांच्या जीवाला धोका होईल, अशी वाहने चालविणे टाळणे गरजेचे आहे.
रात्री उशिरापर्यंत होतेय कारवाई
शहरात नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी २ पथके तयार केली आहेत. यामध्ये लाॅकडाऊनच्या कालावधीत रात्री उशिरा रस्त्याने फिरणाऱ्या व अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या वाहनांवर दररोज शिवाजी महाराज पुतळा परिसरात रात्री दहा वाजेपर्यंत कारवाई केली जात आहे.