परभणी : कोरोनाचा संसर्ग ओसरला असला तरी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आता झिका व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात या विषाणूचा एकही रुग्ण नसला तरी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना करण्यास प्रारंभ केला आहे.
डेंग्यूसदृश आजारांप्रमाणेच झिका हा देखील संसर्गजन्य आजार आहे. एडिस या डासापासूनच झिका आजार पसरतो. सध्या परभणी जिल्ह्यात या आजाराचा एकही रुग्ण नाही. परंतु, शेजारील राज्यांमध्ये झिकाचे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात खबरदारीची उपाययोजना सुरू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
कशामुळे होतो?
एडिस या डासामुळे झिकाचा संसर्ग वाढतो. १९४७ मध्ये या संसर्गाचे रुग्ण आढळले होते. महाराष्ट्रात सध्या एकही रुग्ण नाही. परंतु, शेजारील राज्यात या संसर्गाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे खबरदारी घेतली जात आहे. विशेषत: गरोदर मातांमध्ये हा संसर्ग अधिक प्रमाणात पसरतो. ज्या मातांना ताप आहे आणि त्यांची आरटीपीसीआर, रॅपिड टेस्ट निगेटिव्ह आहे, अशा मातांचे रक्त नमुने पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत.
उपाययोजना काय ?
झिकाचा संसर्ग वाढू नये, यासाठी डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करणे ही प्रमुख उपाययोजना आहे. या अंतर्गत चार आठवड्यांपर्यंत कंटेनर सर्वे करणे, डास उत्पत्ती असणाऱ्या ठिकाणी ॲबेटची फवारणी करणे, धूर फवारणी करणे, कोरडा दिवस पाळणे, गरोदर मातांनी मच्छरदाणीचा वापर करणे आदी उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक आरोग्य केंद्रांमध्ये गरोदर मातांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तापाची लक्षणे असल्यास त्यांचे रक्त नमुनेही तपासणीसाठी घेतले जाणार आहेत.
झिका साथीच्या पार्श्वभूमीवर सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. गरोदर मातांची ठिकठिकाणी तपासणी करणे, कोरडा दिवस पाळणे, डास उत्पत्तीस्थळे नष्ट करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना केल्या जात आहेत.
- डॉ. व्ही. आर. पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी
झिका व्हायरसची लक्षणे काय
n डेंग्यू आजाराप्रमाणेच झिका आजारातही ताप येतो. अंगावर पुरळ येतात. डोकेदुखी, सांधेदुखीदेखील जाणवते, त्याचप्रमाणे गरोदर मातांमध्ये प्लेटलेटस् कमी होण्याचे प्रकार आढळतात.