हिवाळ्यात अपघात कसे रोखाल? ही काळजी घ्या...अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 02:45 PM2019-01-01T14:45:09+5:302019-01-01T14:49:28+5:30

नवीन वर्षाची सुरुवात थंडीने केली आहे. अशा काळात धूर आणि धुके यांचा दुष्परिणाम वाहन चालविताना दृष्यमानतेवर होतो. यावेळी काही काळजी घेतल्यास अपघात होण्यापासून रोखले जाऊ शकते.

धुक्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे वाहनाची काच आणि लाईट. यापैकी काच म्हणजेच विंडस्क्रीन जर चांगली असेल तर समोरचे किंवा मागचे पाहणे सोपे जाते. यामुळे विंडस्क्रीनची काळजी घेणे फायद्याचे ठरते. एखाद्या वेळी ही काच बदलावी लागत असल्यास त्यासाठी खराब क्वालिटीची न बदलता चांगल्या प्रतीची वापरावी. कारण काचेमुळे दृष्यमानतेवर मोठा परिणाम जाणवतो.

बाहेरील वातावरणात धुके किंवा थंडी असेल तर आतून काचेवर दव साचायला सुरुवात होते. अशावेळी कारचा एसी सुरु करावा. काचेवर दव साचण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढू लागले आहे. याचे महत्वाचे कारण असे की, अपघातानंतर काचेमुळे इजा होऊ नये म्हणून काचेमध्ये फायबर मोल्डींग केले जाते. यामुळे काचेचे स्फटीक स्वरूपात तुकडे होतात. यामुळे मोठी इजा होत नाही.

फायबरचा वापर केल्याने वाहनाच्या काचेवर दव साचतो. यासाठी वाहनाचा एसी सुरु करावा. यानंतर डिफॉगरचा वापर करून दव घालवावा. सोबत कारमध्ये स्वच्छ, ऑईल न लागलेले कापड ठेवावे. त्याने काच पुसून घ्यावी. अन्यथा तेलाचे डाग उमटल्यास पुन्हा समोरून लाईट पडल्यास काहीच दिसत नाही.

इतर कोणत्याही वस्तूच्या वेगापेक्षा लाईटचा वेग जास्त असतो. धुक्यामध्ये लाल, पिवळी लाईट जास्त परिणामकारक असते. यामुळे हेडलाईट एलईडी, एचडी असण्यापेक्षा हॅलोजन बल्ब असलेली असल्यास जास्त फायद्याचे असते.

धुक्याच्या रस्त्यावरून जाताना कधीही इमरजन्सी लाईट लावू नये. यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनाला तुमच्या वाहनातील अंतर लक्षात येत नाही. यामुळे अपघात झालेले आहेत.

महत्वाचे म्हणजे विंडशिल्ड खराब झाली किंवा फुटल्यास काही पैसे वाचविण्यासाठी खराब क्वालिटीची घेऊ नये. कारच्या विमा पॉलिसीमध्ये विंडस्क्रीनसाठी 100 टक्के कव्हर असते. यामुळे ही किंमत पूर्ण विमा कंपनीकडून दिली जाते.