अधिक मास: ६ राशींना राजयोग, लक्ष्मी-नारायणाची कृपा; अपार धनलाभ, लाभेल समृद्धी, सुख, समाधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 03:03 PM2023-07-21T15:03:03+5:302023-07-21T15:03:03+5:30

अधिक मासात जुळून आलेला शुभ लक्ष्मी नारायण योग कोणत्या राशींसाठी कल्याणकारक अन् भाग्यकारक ठरू शकेल? जाणून घ्या...

१८ जुलैपासून सुरू झालेला अधिक मास १६ ऑगस्टपर्यंत असणार आहे. चातुर्मासातील सात्विक काळात यावर्षी श्रावण महिना अधिक मास आला आहे. १९ वर्षांनी जुळून आलेला हा शुभ योग आता २०४२ रोजी जुळून येईल, असे सांगितले जात आहे. अधिक मासात अनेक शुभ योग जुळून येत आहेत. याचा शुभ प्रभाव अनेक राशींवर पडू शकेल, असे सांगितले जात आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, लक्ष्मी नारायण नामक शुभ राजयोग जुळून येत आहे. नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह २४ जुलै रोजी कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करत आहे. सिंह रास सूर्याचे स्वामित्व असलेली रास असून, या राशीत शुक्र ग्रह विराजमान आहे. शुक्र आणि बुधाच्या युतीने जुळून येत असलेल्या योगाला लक्ष्मी नारायण योग म्हटले जाते.

अधिक मास हा श्रीविष्णूंना समर्पित मानला जातो. यामुळे याला पुरुषोत्तम मास म्हटले जाते. या काळात श्रीविष्णूंचे नामस्मरण, पूजन, आराधना, स्तोत्र पठण, कथा श्रवण अतिशय शुभ मानले गेले असून, याचे पुण्य दसपटीने मिळते, अशी मान्यता आहे. श्रीविष्णूंच्या पूजनाने लक्ष्मी मातेची कृपाही लाभू शकते, असे म्हटले जाते.

यातच लक्ष्मी नारायण योग जुळून येणे अत्यंत शुभ-फलदायी मानले गेले आहे. लक्ष्मी नारायण योगाचा लाभ ६ राशींना मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. सुमारे १५ दिवस हा योग असणार आहे. या काळात कोणत्या राशींना फायदा मिळू शकेल, कोणत्या राशी मालामाल होऊ शकतील, ते जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना लक्ष्मी नारायण योग यशकारक ठरू शकेल. प्रयत्न पूर्वीपेक्षा अधिक वेगाने दिसून येतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला राहील. विचारशक्ती आणि आकलन शक्ती वाढेल. नोकरदारांनाही अनेक चांगल्या संधी मिळतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळेल. कोणत्याही सेवा विभागात काम करत असाल तरीही हा काळ फायदेशीर ठरेल. व्यावसायिकांसाठी काळ चांगला आहे, ते आपला व्यवसाय वाढवू शकतात.

मिथुन राशीच्या व्यक्तींना लक्ष्मी नारायण योग महत्त्वाचा ठरू शकेल. या राशीच्या व्यक्तींवर याचा सर्वाधिक प्रभाव दिसून येईल. आरोग्य चांगले राहू शकेल. अनेक प्रवास होण्याची शक्यता आहे. कामे पूर्ण करण्यासाठी भावंडांचे सहकार्य मिळेल. लेखक, साहित्यिक आणि संपादक यांना नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल. भाग्याचा काळ ठरू शकेल. क्रीडा जगताशी संबंधितांसाठी काळ विशेष अनुकूल राहील.

सिंह राशीच्या व्यक्तींना लक्ष्मी नारायण योग लाभदायक ठरू शकेल. धनलाभाचे योग निर्माण होतील. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे लाभ मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास खूप वाढेल. निर्णय जलद घेण्यास मदत होईल. जोखीम पत्करून संधींचे यशात रूपांतर करू शकाल. मात्र, आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारे गाफील राहू नका.

तुला राशीच्या व्यक्तींना लक्ष्मी नारायण योग विशेष लाभकारी ठरू शकेल. नोकरदार वर्ग खूप भाग्यवान ठरू शकेल. व्यापारी वर्गाला चांगला नफा मिळू शकेल. कमी कष्ट करून उत्पन्न वाढवू शकाल. कला आणि सांस्कृतिक गोष्टींशी निगडित लोकांसाठी वेळ शुभ राहणार आहे. या काळात सर्जनशील कल्पनांमध्ये वाढ होईल.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना लक्ष्मी नारायण योग प्रगतीकारक ठरू शकेल. कार्यक्षेत्रावर प्रभाव दिसणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी प्रगतीचा वेग थोडा कमी होऊ शकतो. जॉब प्रोफाईलमध्ये काही बदल शक्य आहेत. नोकरी बदलण्याचा विचार करत होते त्यांच्यासाठी हा काळ चांगला राहील. मित्रांच्या मदतीने चांगल्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते. नियोजन करून काम करून व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ राशीच्या व्यक्तींना लक्ष्मी नारायण योग विशेष फलदायी ठरू शकेल. प्रेम जीवन खूप चांगले जाणार आहे. प्रेमविवाह करण्याचा विचार करत असाल तर काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल असणार आहे. कामाच्या ठिकाणी कामगिरी चांगली राहील. यामुळे अधिकारी खुलेपणाने प्रशंसा करतील. व्यावसायिकांसाठी हा काळ खूप फायदेशीर असणार आहे.

शुक्र हा रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक मानला जातो. बुध ग्रह उत्तम बुद्धी, तर्कक्षमता कारक असल्याचे सांगितले जाते.

या दोन्ही ग्रहांचा शुभ प्रभाव कल्याणकारक ठरू शकतो, असे सांगितले जाते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.