Adhik Maas 2023: देवाला कोणते गंध लावणे उचित ठरते? त्याची शुद्धता कशी तपासावी ते जाणून घ्या! By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 07:00 AM 2023-07-22T07:00:00+5:30 2023-07-22T07:00:02+5:30
Adhik Maas 2023: १८ जुलैपासून अधिक श्रावण मास सुरू झाला आहे. या काळात भगवान विष्णूंची पूजा करणे पुण्यदायक ठरते. या पूजेत देवाला गंध लावताना तसेच इतरही दिवशी पूजा गंधाची निवड करताना कोणती काळजी घ्यायची ते सांगताहेत आळंदीचे समीर तुर्की. गंधामध्ये "सहाणीवर उगाळलेलं चंदन" हे सर्वश्रेष्ठ सांगितलं आहे. गुढीपाडवा ते मृग नक्षत्र येईपर्यंत (साधारण सात जूनपर्यंत) अस्सल भीमसेनी कापूर व केशर आणि काही थेंब गुलाबापाणी घालून चंदन उगाळावे. एरवी भीमसेनी कापूर वापरू नये. त्यांनतर रक्तचंदन, दुधात खलून घेतलेलं केशर, अष्टगंध वगैरे अनेक पर्याय शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत.
चंदन हे महाग आणि सर्वांना मिळेलच असं नाही. तर अशावेळी अष्टगंध हा सर्वात सुलभ पर्याय वापरावा. अष्टगंध घरीच बनवता येतं किंवा अनेक चांगल्या ब्रँड्स चे उत्तम दर्जाचे विकतही मिळते. फक्त घेतांना काळजी घ्यावी. नाहीतर अष्टगंध म्हणून "रंगीत टाल्कम पावडर" विकत घेऊन फसाल. हल्ली बाजारात तयार "ओला गंध" सुद्धा विकत मिळतो पण काही दिवसांनी त्याला आंबट वास येतो आणि दुसरं म्हणजे कोणतीही कंपनी त्याचे नेमके घटक नमूद करत नाही.
त्याहीपेक्षा सोपा आणि सुलभ पर्याय म्हणजे " गोपीचंदन" ह्याचे दगड सहजपणे सर्वत्र विकत मिळतात. वापरायला, लावायला, उगाळायला अत्यंत सोपा, टिकाऊ आणि शास्त्रदृष्टया देवाला लावायला उत्तम असतो. पाच दहा रुपयांचा गोपीचंदन घेतला तर वर्षभर पुरतो. वारकरी संप्रदायात ह्याचे प्रचंड महत्व आहे. गोपीचंदन वापरत नाही असा वारकरी अगदी चुकूनही सापडायचा नाही. श्राद्धात तर हा आवर्जून वापरावाच लागतो. ह्याचा अजून एक उपयोग म्हणजे तोंड आले असता हा चक्क खातात, जिथे तोंड आलंय तिथेही लावतात. लगेच आराम पडतो.
वरीलपैकी काहीच उपलब्ध नसेल तर हळद + कुंकू एकत्र पाण्यात किंवा गुलाबापाण्यात कालवून लावू शकता.
महत्वाचे म्हणजे म्हैसूर चंदन मिळत नसेल तर "रायवळ चंदन" म्हणून एक चंदनाची थोडी कमी सुगंधी प्रजाती खेड्यापाड्यात सहज उपलब्ध असते. ओळखीच्या शेतकऱ्यांना सांगितलं तर चोरी झालेल्या झाडाच्या बुंध्यातलं एखादं किलोदीडकिलोचं खोड सुद्धा पाचएकशे रुपयांत मिळतं. हे उगाळायला थोडं जड असतं, अगदी लोण्यासारखं मऊ उगळलं जात नाही, किंचित रवाळ उगाळलं जातं. वास असतो पण घमघमाट नसतो.