Adhik Maas Puja 2023: देवपूजेसाठी फुलं निवडताना 'हे' महत्त्वाचे नियम पाळा आणि दिलेल्या चुका टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 11:15 AM2023-07-21T11:15:34+5:302023-07-21T11:31:16+5:30

Adhik Maas 2023: आपल्याला जशा ताज्या वस्तू, पदार्थ आवडतात तसे देवालाही आपण ताज्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करतो. सध्या अधिक मास सुरू आहे. हा काळ पुण्यसंचयाचा, देव पूजेचा. अशावेळी देवपूजेत ताजी फुले वाहताना कोणती काळजी घेतली पाहिजे, ते सांगताहेत आळंदीचे समीर तुर्की!

देवपूजा करण्यासाठी शक्यतो फुलं ताजी, सुवासिक ( गोकर्ण सुवासिक नसला तरीही आवर्जून वाहतात), तजेलदार आणि मोहक अशी वापरावीत. सडकी, कुजलेली, गळून गेलेली फुलं अजिबात वाहू नये.

शक्यतो विलायती, हायब्रीड फुलं वापरू नयेत. घरच्या अंगणातली फुलं वापरावीत. तशी सोय नसेल तर विकतच्या फुलांचा वापर करावा. ओळखीतल्या फुलवाल्याकडून फुलं घ्यावीत, जेणेकरून वाहिलेली, वापरलेली फुलं मिळण्याची शक्यता राहत नाही.

विसंगती निर्माण होईल अशी फुलं देवाला वाहू नये. उदा. जास्वंदी शंकराला वाहू नये. तेरडा, सदाफुली कोणत्याच देवतेला वाहू नये.

उलटी फुलं अगदी चुकूनही देवाला वाहू नयेत. देठ देवाकडे करूनच फुलं वाहावीत. देवतेच्या डोळ्यांवर फुलं/ पाकळ्या येतील अश्याप्रकारे सुद्धा फुलं वाहू नयेत.

हार घालणार असाल तर त्यामध्ये प्लॅस्टिक, थर्मोकोल असणार नाही ह्याची खात्री करून घ्यावी. ताजी फुलं मिळाली नाहीत तर शेवंती, झेंडू वगैरे टिकाऊ पण चांगली फुलं घ्यावीत. तीही न मिळाल्यास योग्य प्रकारे अक्षता व अल्कोहोल नसलेलं उत्तम दर्जाचे अत्तर वापरावे.