स्वप्नात 'या' सहा गोष्टी वारंवार दिसणे हे आर्थिक वृद्धीचे लक्षण मानले जाते! By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 02:15 PM 2021-12-06T14:15:29+5:30 2021-12-06T14:20:03+5:30
प्रत्येक व्यक्तीला आरामदायी जीवन आवडते. पण कष्टाशिवाय हे स्वप्न कोणाचेही साकार होत नाही. अगदी श्रीमंतांचेही नाही. कारण वरवर दिसणारी श्रीमंती टिकवूनही ठेवता आली पाहिजे. तिचा ऱ्हास व्हायला वेळ लागत नाही. म्हणून कष्टाला पर्याय नाही. भरपूर संपत्ती आणि विलासी जीवन प्रत्येकाला सहजासहजी मिळत नाही. तरीही माणूस त्याची स्वप्ने पाहतो. श्रीमंत व्हावे असे प्रत्येकाचे स्वप्नं असते. हे स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी मनुष्य धडपडत असतो आणि म्हणूनच त्याला झोपेत आणि जागेपणी धनवृद्धीची स्वप्ने दिसत असतात. या वैचारिक स्थितीमुळे झोपतेही विचारांचे चक्र सुरू राहते आणि विचार व प्रयत्न योग्य दिशेने सुरू असले, तर स्वप्नात शुभ संकेतही मिळतात. स्वप्न शास्त्रानुसार कधी कधी स्वप्नांमध्ये काही खास गोष्टी दिसतात व झोपेतून उठल्यावरही त्या गोष्टी पाहिल्याचे आपल्या स्मरणात राहते. त्या खास गोष्टी कोणत्या, ज्या आर्थिक समृद्धी दर्शवतात, त्या सहा गोष्टी जाणून घेऊ.
शंख ध्वनी शंखध्वनी ऐकणे शुभ मानले जाते. जर तुम्हाला झोपेतही शंख ध्वनी ऐकल्याचा भास होत असेल तर ते शुभ लक्षण आहे. याचा अर्थ तुमची आर्थिक स्थिती लवकरच सुधारणार आहे.
देवीचे देऊळ अनेकांना स्वप्नात जुनी, प्राचीन व आजवर प्रत्यक्षात न पाहिलेली मंदिरे दिसतात. त्यात जर तुम्हाला देवीचे दर्शन घडत असेल तर हे अतिशय शुभ आहे. देवीच्या कृपेने तुमच्या मार्गातील अडथळे दूर होऊन शुभ वार्ता ऐकायला मिळणार आहे.
फुले झोपेतच काय, तर जागेपणीही फुलं पाहिल्यावर मन प्रसन्न होते. स्वप्नात तुम्हाला अशीच छान फुलांनी डवरलेली बाग दिसत असेल तर तुमची मनस्थिती उत्तम आहे, हे लक्षात घ्या. मन शांत असते तेव्हा अर्ध्याहून अधिक कामे वेळेत पार पडतात. याशिवाय स्वप्नात मोर, शहाळ किंवा फुलांचा हार दिसणे हे शुभ लक्षण आहे. ही स्वप्ने धनप्राप्तीचे संकेत देतात.
घुबड घुबड हे लक्ष्मीचे वाहन आहे. स्वप्नात घुबड दिसणे शुभ असते. जर स्वप्नात घुबड दिसले तर त्याचा अर्थ असा होतो की येत्या काही काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे.
पांढरी गाय स्वप्नात गाय दिसणे शुभ मानले जाते. त्यातही ती पांढरी शुभ्र गाय असेल, तर याचा अर्थ लवकरच काही विशेष लाभ होणार आहे. त्यासाठी स्वप्नातून जाग आल्यावर गोमातेची सेवा करायला तसेच तिला चारा पाणी द्यायला विसरू नका.
मंगल कलश कलश आपण पूजेत मांडतो. स्वस्तिक काढलेला, आम्रपल्लव घातलेला कलश पाहून मन प्रसन्न होतं. जर स्वप्नात असा मंगल कलश दिसत असेल तर लवकरच घरात मंगल कार्य घडणार असल्याचे संकेत आहेत. त्या निमित्ताने आप्त स्वकीयांच्या भेटी होतील व घरात आनंदाचे वातावरण राहील.