Ganesh Chaturthi 2021 : गणेश चतुर्थीच्या दिवशी 'या' पाच गोष्टी चुकूनही करू नका, अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 08:00 AM2021-09-09T08:00:00+5:302021-09-09T08:00:07+5:30

Ganesh Chaturthi 2021 : भाद्रपदातील शुक्ल चतुर्थीपासून अर्थात १० सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरू होत आहे. एव्हाना घराघरातील गणपती आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असेल यात शंका नाही. बाप्पा वाजत गाजत येऊन मखरात विराजमान झाले आणि प्राणप्रतिष्ठा झाली की सगळी मेहनत सार्थकी लागल्यासारखी वाटते. ज्यांच्या घरी गणपती येतो त्यांच्याकडे सोवळे पाळले जाते, परंतु ज्यांच्याकडे गणपती येत नाही, त्यांनी देखील निदान गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पासाठी सोवळे पाळायला हवे, असे शास्त्र सांगते. सोवळे पाळायचे म्हणजे नेमके काय करायचे, हे समजून घेण्यासाठी पुढे दिलेल्या पाच चुका कटाक्षाने टाळा, जेणेकरून घरातले पावित्र्य अबाधित राहील.

गणेश चतुर्थीच्या दिवशी तुमच्या घरात नैवेद्याचा स्वयंपाक असो व नसो, कांदा-लसूणाचा वापर टाळा. आपोआपच स्वयंपाकाला नैवेद्याची ओळख मिळेल.

मांसाहार टाळा. अनेक जण श्रावण संपला म्हणून आनंदाने मांसाहार सुरू करतात, परंतु निदान गणेश चतुर्थीच्या दिवशी सात्विक आहार घेऊन सणाचे पावित्र्य राखा.

गणपतीची प्राणप्रतिष्ठा आपल्या सोयीच्या वेळेत न करता दिलेल्या शुभ मुहूर्ताच्या आतच करा. यंदा सकाळी पावणे सहा ते दुपारी पाऊण वाजेपर्यंत मूर्ती प्रतिष्ठापनेची वेळ दिली आहे. वेळेत दिरंगाई करू नका.

आपल्या घरात गणपती बसत नसले, तरी देव्हाऱ्यातल्या गणपतीची यथासांग पूजा करून गूळ, खोबरे किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवा. पूजेसाठी सकाळी वेळेत उठून स्नान आटोपून दाराला आम्रपल्लव लावा. त्यादिवशी अंघोळीचा आळस करू नका. आणि गणपती बाप्पा घरी येणार असले तर सगळ्यांच्या आधी उठून स्नान आटोपून बाप्पाच्या स्वागताला सज्ज राहा.

बाप्पाची मूर्ती आणखी आकर्षक दिसावी या नादात अलंकार, पुष्पहार घालताना सावधानता बाळगा. मूर्ती नाजूक असते. तिला थोडा जरी धक्का लागला तर ती दुभंगून जाऊ शकते आणि आपल्या हातून मूर्ती भग्न झाल्याची हुरहूर मनाला लागून राहते. म्हणून बाप्पाच्या मूर्तीची सर्वतोपरी काळजी घेत बाप्पाला सही सलामत निरोप द्या. म्हणजे तुम्ही खुश आणि तुमचा पाहुणचार घेऊन बाप्पाही खुश!

Read in English