Gudi Padwa 2023 : वास्तुदोष दूर होऊन घरात भरभराट व्हावी म्हणून चैत्र नवरात्रीत 'हे' विशिष्ट उपाय अवश्य करा! By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 07:30 AM 2023-03-21T07:30:00+5:30 2023-03-21T07:30:02+5:30
Gudi Padwa 2023: चैत्र नवरात्र हा शक्तीच्या उपासनेचा उत्सव आहे. शारदीय आणि शाकंभरी नवरात्रप्रमाणे चैत्र नवरात्रीत देवीची उपासना केली जाते. यावर्षी २२ मार्चपासून चैत्र नवरात्र सुरू होईल आणि ३० मार्च रोजी संपेल. चैत्र नवरात्र धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ आणि आल्हाददायी मानली जाते. या उपासनेने वास्तू दोष दूर होतात. त्यासाठी पुढील विशेष व्रत विधी केले जातात. चैत्र नवरात्रीत अनेक जण घटस्थापना करून शारदीय नवरात्रीप्रमाणे घटाचे पूजन करतात. परंतु तुमच्याकडे चैत्र नवरात्रीत घट पुजण्याची प्रथा नसली, तरी नवरात्रीचे नऊ दिवस पाण्याने भरलेला कलश, घट घराच्या ईशान्य कोनाड्यात ठेवावा. वास्तुशास्त्रानुसार ही दिशा पूजेसाठी शुभ असते. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते.
चैत्र नवरात्रीत अखंड ज्योतीचे विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार आग्नेय कोनात (दक्षिण-पूर्व) अखंड दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने रोग दूर होतात असे वास्तुशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात. यासोबतच शत्रूपासूनही सुटका मिळते.
चैत्र नवरात्रीच्या काळात लक्ष्मीची पूजा केली जाते. चैत्र नवरात्रीच्या दिवशी घराच्या प्रवेशद्वारावर लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढावेत. तसे केल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकृष्ट होते आणि यासोबतच धन-संपत्तीतही वाढ होते.
चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भरलेला मंगल कलश नवमीच्या दिवशी फुलझाडांना पाणी घालून रिता करावा. तत्पूर्वी आम्रपल्लव घेऊन कलशातले पाणी घराच्या सर्व कानाकोऱ्यात शिडकावे. त्यामुळे घरातील वातावरण मंगलमय आणि पवित्र होते, तसेच नकारात्मक शक्ती निघून जातात.
नवरात्रीचा उपास किंवा दैनंदिन पूजा करणाऱ्यांनी चैत्र पंचमीला म्हणजेच नवरात्रीच्या पाचव्या दिवशी कुमारिकेला आणि अष्टमी-नवमीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रीला तसेच ज्येष्ठ महिलेला बोलवून जेवू घालावे. यथाशक्ती दान करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. आपल्या घरात अतिथी रूपात आलेल्या लक्ष्मी मातेचे उष्ट सांडल्याने भरभराट होते.
तसेच चैत्र नवरात्रीत हळद कुंकू समारंभ आयोजित करून सुवासिनीची ओटी भरावी आणि त्या ओटीतील थोड्या अक्षता प्रसाद म्हणून आपल्या तांदुळाच्या डब्यात टाकाव्यात. त्यामुळे अन्नपूर्णेचा आशीर्वाद लाभून घरात कोणत्याही गोष्टीची उणीव भासत नाही.