यंदाचा व्हॅलेंटाईन तुमच्यासाठी 'लकी' ठरावा असे वाटत असेल, तर राशीनुसार करा या गोष्टी! By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 05:17 PM 2021-02-12T17:17:44+5:30 2021-02-12T17:36:48+5:30
१४ फेब्रुवारी रोजी पूर्ण विश्व व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना, तुम्ही सुद्धा तुमचे नशीब आजमावणार असाल, तर तुमच्या प्रयत्नांना पुढील गोष्टींची जोड द्या. प्रयत्नात कसूर राहायला नको, म्हणून काही उपयुक्त माहिती. मेष : तुमची प्रेमदेवता तुमच्यावर प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. आजवर तुमच्या नात्यात येत असलेल्या अडचणी दूर होतील. तुम्ही जर प्रेमाचा प्रस्ताव मांडणार असाल, तर सोबत एक गुलाब आणि प्रेमाचे भेटकार्ड घेऊन जा. सिंह किंवा धनु राशीची व्यक्तीची मदत तुम्हाला उपयोगी पडू शकते. सायंकाळी ५.३० ते ७.३० ही वेळ भेटीसाठी उत्तम ठरेल.
वृषभ : या दिवशी तुम्ही प्रेम व्यक्त करू शकाल. तुमचे प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही हर तऱ्हेचे प्रयत्न कराल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र, कदाचित लगेच उत्तर न मिळता काही दिवस तुम्हाला प्रतिक्षा करावी लागेल. तूळ किंवा कुंभ राशीच्या व्यक्तीची तुम्हाला मदत मिळू शकेल. सायंकाळी ४.३० ते ६.३० ही तुमची त्या दिवसाची शुभ वेळ आहे.
कर्क : तुमच्या नात्यात जवळीक वाढेल. नवीन नात्याची सुरुवात होईल. तुमचा प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारला जाईल. वृश्चिक किंवा मीन राशीच्या व्यक्तीची मदत होईल. नवीन नात्याची सुरुवात चॉकलेट खाऊन केलीत, तर ती अविस्मरणीय भेट ठरेल. शक्य असल्यास आपण गुलाबी रंगाचे कपडे घालावेत. सायंकाळी ५.३० ते ७ ही शुभवेळ असेल.
सिंह : तुम्हाला अपेक्षित असलेला जोडीदार तुमच्या भाग्यात प्रवेश करण्याचे संकेत आहेत. मात्र तुम्हाला त्याच्या प्रेमाची विंâमत कळली पाहिजे. आणि तुमच्या नात्याचा मान राखला पाहिजे. बाजारातील भेटवस्तू न देता तुम्ही स्वत: बनवलेली एखादी गोष्ट जोडीदाराला दिलीत तर ती भेट संस्मरणीय ठरेल. कन्या किंवा वृश्चिक राशीच्या मित्राची मदत होईल. सकाळी ९.३० ते दुपारी २ पर्यंतची वेळ शुभ असणार आहे.
कन्या : तुम्ही जर विवाहेच्छुक असाल आणि तुम्हाला स्थळं येत असतील, तर या दिवशी आलेल्या स्थळाचा नक्की विचार करा. तिथे तुमचे सूर जुळण्याची शक्यता आहे. ती व्यक्ती केवळ फोनवरून किंवा संभाषणावरून देखील तुम्हाला आवडू शकेल. इतरांप्रमाणे तुमची प्रेमाची गाडी सुसाट न धावता थोडे टप्पे घेत घेत जाईल, परंतु प्रवास योग्य दिशेने सुरू होईल. मकर किंवा वृषभ राशीच्या लोकांची मदत घेऊ शकता. सायंकाळी ८.१५ ते रात्री १०.४५ ही तुमची शुभ वेळ असणार आहे.
तूळ : तुम्ही आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीला छानशी भेट देऊन आश्चर्यचकित कराल. परिणामी तुमचा पूर्ण दिवस प्रेमभरल्या वातावरणात जाऊ शकेल. तुमची प्रेमदेवता प्रसन्न झाल्यामुळे तुम्हालाही आनंद होईल. मिथुन आणि कुंभ राशीची तुम्हाला मदत मिळेल. भाग्य जोरात असल्यामुळे तुम्ही कसोशीने प्रयत्न करा. दुपारी ४.२० ते सायंकाळी ६.३० ही वेळ तुमच्यासाठी उत्तम ठरेल.
वृश्चिक : तुमच्या प्रेम मार्गातील आजवरचे सर्व अडथळे दूर होतील. तुम्हाला तुमचा जोडीदार भेटवस्तू किंवा आनंदवार्ता देईल. तुम्ही प्रेम पत्र लिहिण्याचा प्रयत्न केलात, तर ती भेट खूप आकर्षक ठरेल. सायंकाळी जोडीदाराबरोबर दूरवर रपेट मारून येण्याचा पर्याय उत्तम ठरेल. ही वेळ दोघांसाठी अविस्मरणीय ठरेल. कर्क किंवा मीन राशीच्या व्यक्तीची तुम्हाला मदत होईल. सायंकाळी ६.४५ ते रात्री ८.४५ ही शुभ वेळ ठरेल.
धनू : नेहमी धीटाईने काम करणारे तुम्ही, प्रेमाच्या बाबतील आत्मविश्वासाचा अभाव असल्याचे जाणवेल. परंतु, अतिकाळजी न करता तुम्ही तुमच्याकडून प्रेमाचा प्रस्ताव मांडण्यात अजिबात कचरू नका. तो प्रस्ताव मान्यदेखील होऊ शकतो. म्हणून तुम्ही पूर्ण प्रयत्न करा. मेष किंवा सिंह राशीच्या व्यक्तीची मदत घ्या. संध्याकाळी ७ नंतर तुमच्यासाठी शुभ वेळ असणार आहे.
मकर : तुमचे गुलाबी दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी रोजच व्हॅलेंटाईन डे असणार आहे. तरीदेखील हा दिवस खास बनवण्यासाठी तुम्ही प्रियकराला किंवा प्रेयसीला प्रेम पत्राची भेट द्या. कन्या किंवा वृषभ राशीच्या व्यक्तीची मदत घ्या. नीळा रंग तुमच्या साठी शुभ रंग आहे. सायंकाळी ५ ते ७.४५ ही वेळ तुमच्यासाठी उत्तम ठरेल.
कुंभ : अनोळखी व्यक्ती अचानक तुमच्या संपर्कात येईल. तुम्ही तिच्याबरोबर दिवस घालवाल़ आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घ्याल. कदाचित ती व्यक्ती किंवा तिच्या ओळखीतून तुम्हाला तुमचा जोडीदार सापडण्याची शक्यता आहे. अंतिम निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तो डोळसपणे घ्या. सायंकाळी ४.४५ ते ६.१५ ही वेळ तुमच्यासाठी शुभ ठरेल.
मीन : जोडीदाराकडून छान भेट मिळेल. त्याचा सहवास मिळेल. आयुष्याचा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकाल. कर्क किंवा वृश्चिक राशीची व्यक्ती तुमच्या प्रेमसंबंधात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. तुमच्या बोलण्याने, व्यवहाराने जोडीदार तुमच्याकडे आकृष्ट होईल. सायंकाळी ६.३० ते ८ ही वेळ तुम्हाला शुभ ठरेल.