Pandav Panchami 2021: आजही 'या' ठिकाणी पांडव पंचमीला होते पांडवांची पूजा; पाहा, महत्त्व, मान्यता आणि कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 01:25 PM2021-11-08T13:25:51+5:302021-11-08T13:30:05+5:30

Pandav Panchami 2021: कार्तिक शुद्ध पंचमी ही पांडव पंचमी, कड पंचमी, जैनांची ज्ञानपंचमी म्हणून साजरी केली जाते. जाणून घेऊया...

चातुर्मासातील शेवटचा महिना म्हणजे कार्तिक महिना. मराठी वर्षात कार्तिक महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात दिवाळीचा मोठा सण साजरा केला जातो. तसेच या महिन्यात चातुर्मास, महालयाची समाप्तीही होते. (Kartik Panchami 2021)

कार्तिक महिन्यातील बहुतांश दिवसांचे महत्त्व विशेष असेच आहे. याच महिन्यात कार्तिक एकादशी, त्रिपुरारी पौर्णिमा, तुलसी विवाह असे महत्त्वाचे दिवस साजरे केले जातात. कार्तिक महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात दररोज काही ना काही विशेष असल्याचे आढळून येते. (Importnace of Pandav Panchami)

कार्तिक महिन्याची सुरुवात प्रतिपदा दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा म्हणून साजरी केली जाते. याच क्रमात कार्तिक शुद्ध पंचमी ही पांडव पंचमी, कड पंचमी, जैनांची ज्ञानपंचमी म्हणून साजरी केली जाते. कार्तिक शुद्ध पंचमी पांडव पंचमी म्हणून का साजरी केली जाते? जाणून घेऊया... (History of Pandav Panchami)

महाभारतातील दोन महत्त्वाचे घटक म्हणजे पांडव आणि कौरव. श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली युद्ध करून अल्प संख्याबळ असूनही बलाढ्य अशा कौरवसेनेचा नायनाट करणार्‍या पांडवांनी जगासमोर मोठा आदर्श उभा केला. पांडवांसारखे गुण आपल्यात यावेत, यासाठी हा दिवस साजरा करतात, अशी मान्यता आहे. (Tradition of Pandav Panchami)

द्यूतात कौरवांकडून हरलेल्या पांडवांना कबूल केल्याप्रमाणे १२ वर्षे वनवास व १ वर्ष अज्ञातवासात काढावे लागले. कार्तिक शुक्ल पंचमीला पांडव अज्ञातवासातून प्रकट झाले. आपण ऋषीपंचमी साजरी करतो, त्याप्रमाणे भारतीय संस्कृतीत पांडव पंचमीदेखील साजरी केली जाते. पांडव पंचमी म्हणजे पांडवांच्या विजयामुळे त्यांची पूजा करून त्यांच्यात असलेले शौर्य, विरता आणि आदर्श गुणांचे पूजन करण्याची परंपरा प्रचलित असल्याचे दिसून येते.

संपूर्ण देशभरात पांडवांसारखे पुत्र घराघरात जन्माला यावेत आणि पांडवांचे गुण, शौर्य, विरता आणि हार न मानण्याची शक्ती आपल्या अपत्यात यावी, यासाठी पांडवांची पूजा मोठ्या भक्तीभावाने करण्याची परंपरा प्रचलित आहे. यावेळी श्रीकृष्णाचे पूजनही आवर्जुन केले जाते. या दिवशी श्रीकृष्णाचा नामजप अधिकाधिक करावा, असे सांगितले जाते.

पांडव पंचमीला गोमयापासून पांडव सिद्ध करतात आणि त्यांची पूजा करतात. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्याचे पुजारी कांकेर गावात आजच्या काळातही पांडवांची पूजा करतात. येथे दर दोन वर्षांनी एका मोठ्या यात्रेचे आयोजित केल्या जाते. कौरावांकडून सर्व काही गमावल्यानंतर पांडव दंडकारण्य भागात काही काळासाठी वास्तव्यास होते.

पांडव अज्ञातवासात गेले असता त्यांनी या भागात आश्रय घेतला होता. म्हणून या डोंगराचे नाव पांडव पर्वत नाव पडले. या पर्वतावरून पांडव भोपाळत्तनम जवळील सक्काळनारायण गुहेत श्रीकृष्णाची मूर्ती असल्याचे पाहायला मिळते. (Significance of Pandav Panchami)

कार्तिक शुद्ध पंचमी हा दिवस जैन संस्कृतीत ज्ञानपंचमी म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जैन बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. जैन प्रार्थना स्थळांमध्ये या दिवशी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कार्तिक शुद्ध पंचमी हा ज्ञानपूजेचा दिवस मानला जातो. (History of Gyan Panchami)

या दिवशी ध्यान व प्रार्थना केल्यास 'दुसरा सूर्य' म्हणजेच 'ज्ञान' प्राप्त होते, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते. ज्ञानपंचमी एक सण म्हणून जैन बांधव साजरा करतात, असे सांगितले जाते. (Significance of Gyan Panchami)

Read in English