शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोणत्याही मंत्राची सुरुवात ॐ ने का केली जाते? वाचा, महात्म्य, महत्त्व आणि तथ्य

By देवेश फडके | Published: January 20, 2021 7:41 PM

1 / 8
भारतीय संस्कृतीमध्ये आराध्याचे पूजन, नामस्मरण, उपासना, आराधना करण्याची प्राचीन परंपरा आहे. यासाठी मंत्र, स्तोत्र यांचे पठण केले जाते. बहुतांश मंत्राची सुरुवात ही ॐ ने केली जाते. मंत्रांच्या बाबतीत बोलायचे झाले, तर तो जेवढा लघु आणि सूक्ष्म असतो, तितका म्हणायला सोपा आणि अधिक ताकदीचा असतो, असे सांगितले जाते.
2 / 8
मंत्र छोटा असल्यामुळे म्हणताना मनाची एकाग्रता वाढते आणि मंत्र जास्त परिणामकारक होतो. हा प्रवास 'जड'कडून सूक्ष्मतेकडे जाणारा असतो. म्हणून ओमकाराने आपल्या सर्व शरीरात प्रेरणेचा संचार होतो, असे म्हटले जाते. विश्वाची उत्पत्ती करण्यासाठी ब्रह्मदेवांनी १२ वर्षे ओमकार करून तपश्चर्या केली. ब्रह्मदेवांची १२ वर्ष म्हणजे पृथ्वीची ३७,३२,४८० कोटी वर्षे असल्याचे सांगितले जाते.
3 / 8
ॐ किंवा प्रणव हे सगळ्या मंत्रांचे पहले बीज अक्षर आहे. हे बीजाक्षर सगळ्या बीज मंत्रांचा शिरोमणी आहे, असे मानले जाते. एका ॐ अक्षरामध्ये तीन अक्षरांचा समावेश होतो. 'अ', 'ऊ' आणि 'म' ही अक्षरे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानली गेली आहेत. म्हणूनच कोणत्याही मंत्राच्या आधी ओंकार लावला, तर त्या मंत्राची शक्ती कितीतरी पटीने वाढते, असे सांगितले जाते. ओमकार हा साडे तीन मात्रांचा बनलेला असतो.
4 / 8
श्रीकृष्णाने सांगितलेल्या भगवद्गीतेनुसार, ॐ उच्चारणाऱ्या व्यक्तीला पुण्यप्राप्ती होते. ईश्वरी कृपेने ॐ चा मंत्रोच्चार करणाऱ्याला परम गती प्राप्त होते, असे सांगितले गेले आहे. कोणत्याही मंत्रोच्चारापूर्वी ॐ कार लावल्याने तपस्वी आणि योगिमुनींच्या ज्ञानाची शक्ती त्या मंत्रापाठी भक्कमपणे उभी राहते, असे कठोपनिषदात सांगितले आहे.
5 / 8
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकदेव यांनीही 'इक ओंकार सतनाम' म्हणजेच ॐ कार हेच खरे सत्य असे नाव आहे, अशी त्याची व्याख्या केली आहे. ओंकाराचा अर्थ 'अनुज्ञा' म्हणजेच स्वीकृती, असा केला गेला आहे. माण्डूक्य उपनिषदातही ॐ काराचा महिमा वर्णन करण्यात आला आहे.
6 / 8
अनेक धर्मग्रथांमध्ये ॐ काराचे महत्त्व वर्णन करण्यात आले आहे. कोणत्याही मंत्राआधी ॐ कार जोडणे हे शुद्ध आणि शक्ती संपन्न मानले गेले आहे. जैन दर्शनमध्येही ॐ काराचे महत्त्व आणि महात्म्य अधोरेखित करण्यात आले आहे. महात्मा कबीर यांनी ॐ काराचे महत्त्व जाणून त्यावर 'साखियां' रचल्या आहेत.
7 / 8
ॐ कारातील 'अ' या अक्षराच्या उच्चाराने ब्रह्मदेवाचे स्मरण होते. 'उ' या वर्णाच्या उच्चाराने श्रीविष्णूचे स्मरण होते. म् उच्चारामुळे शिवाचे स्मरण होते, अशी मान्यता आहे. हे बीजाक्षर 'अ', 'ऊ' आणि 'म' या वेगवेगळ्या अक्षरांनी तयार झाले असले तरी, ही तिन्ही अक्षरे कुठेही न थांबता सलगपणे म्हणावी, असे सांगितले जाते.
8 / 8
ॐ कारातील आद्य स्वर स्वर उच्चारल्यास आपणास मूलध्वनीचा आभास होतो. 'उ' हा मुखोत्पन्न सर्वाधिक तीव्र स्वर आहे. ही तीव्र शक्ती आहे, ती आपणास संकटाप्रसंगी शरीराला ऊर्जा प्रदान करते. 'म' प्राथमिक अनुनासिक असून, ते उच्चारले असता वातावरण शांत होते. हा उच्चार आपणास परमतत्त्व शिवाचा आभास घडवतो. अशाप्रकारे, ॐ कार परमतत्त्व प्रदर्शक आहे, असे सांगण्यात आले आहे.